Sonu Sood : बॉलिवूडमधील लोकप्रिय स्टार सोनू सूदचे (Sonu Sood) जगभरात असंख्य चाहते आहेत. चित्रपटांमध्ये हिरोपेक्षा खलनायिकी भूमिका साकारून त्याने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान मिळवलं. गोरगरिबांसाठी देवदूत ठरणारा सोनू सूद सध्या त्याच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकादा चर्चेत आलाय. सोनू सूदने करोनाकाळात केलेल्या मदत कार्यामुळे त्याचे अनेकांनी कौतुक केलं. सध्या सोनू सोदू चर्चेत येण्यामागचं कारण त्याला मिळालेलं अटक वॉरंट ठरलं आहे. पंजाबमधील लुधियाना कोर्टाकडून त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. न्यायमूर्ती रमणप्रीत कौरने हा वॉरंट जाही केला आहे. त्यामुळे अभिनेता कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर सोनू सूदने पहिल्यांदा भाष्य केलंय.
सोनू सूद सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्या माध्यमातून अटक वॉरंट प्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिलंय की, "आम्हाला हे स्पष्ट करायचं आहे की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होणाऱ्या बातम्या या अत्यंत खळबळजनक आहेत. या प्रकरणाबद्दल सांगायचं झालं तर, माननीय न्यायालयाने मला एका तृतीय पक्षाशी संबंधित प्रकरणात साक्षीदार म्हणून बोलावले आहे, ज्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. आमच्या वकिलांनी या प्रकरणी त्यांच्याकडून प्रतिक्रिया दिली आहे. शिवाय १० फेब्रुवारी २०२५ रोजी या प्रकरणात माझा सहभाग नसल्याचं स्पष्टीकरण देणारे निवेदन न्यायालयात सादर करु. "
पुढे अभिनेत्याने म्हटलंय, "मी ब्रँड ॲम्बेसेडर तर नाहीच आणि या प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नाही. सोशल मीडियावरील बातम्या फक्त लोकांचं लक्ष वेधण्यासाठी पसरवल्या जात आहेत. सेलिब्रिटींना कायमच सॉफ्ट टार्गेट केलं जातं हे अत्यंत वाईट आहे. याप्रकरणी आम्ही कठोर कारवाई करू."
नेमकं प्रकरण काय?
रिपोर्ट्सनुसार, लुधियानाचे वकील राजेश खन्नाने मोहित शुक्ला या व्यक्तीविरोधात १० लाखांची फसवणुकीची केस दाखल केली. शुक्लाने त्यांना गुंतवणुकीचं आमिष दाखवत त्याची फसवणूक केली होती. सोनू सूद हा आरोपीच्या कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली. याच कारणामुळे सोनू सूदला या प्रकरणात साक्ष देण्यासाठी बोलावण्यात आले होते. वारंवार समन्स बजावल्यानंतरही सोनू सूद न्यायालयात हजर राहिला नाही, त्यामुळे त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आल्याचे वृत्त आहे.