Vikrant Massey And Shanaya Kapoor Film: '१२ वी फेल' च्या यशानंतर अभिनेता विक्रांत मेस्सीकडे (Vikrant Messay) चित्रपटाची रांग लागली आहे. वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये सध्या अभिनेता व्यस्त असल्याचा पाहायला मिळतो आहे. अलिकडेच विक्रांत मेस्सीची 'द साबरमती रिपोर्ट' सिनेमामुळे चर्चा होती. आता लवकरच एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'ऑंखो की गुस्ताखियॉं' असं या चित्रपटाचं नाव आहे. बॉलिवूड अभिनेता संजय कपूरची लेक शनायाची ही डेब्यू फिल्म आहे. शनाया आपल्या करिअरमधील पहिल्याच चित्रपटात विक्रांत मेस्सीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. दरम्यान, नुकतंच या चित्रपटाचं शूटिंग संपलं आहे. सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर करत शनाया कपूरने (Shanaya Kapoor ) तिच्या चाहत्यांना माहिती दिली आहे.
अगदी काही महिन्यांपूर्वीच डेहराडून येथे 'ऑंखो की गुस्ताखियॉं' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली होती. आता हे शूट पूर्ण झाल्याची अपडेट समोर येत आहे. त्यामुळे सिनेमाप्रेमींना उत्सुकता आहे. शनाया कपूरने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या सेटवरील अखेरच्या दिवसांची खास झलक दाखवली आहे. "स्पेशल..." असं कॅप्शन तिने या पोस्टला दिल्याचं पाहायला मिळतंय.
संतोष सिंग हे 'ऑंखो की गुस्ताखियॉं' या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. तर मानसी बागला आणि वरुण बागला यांची निर्मीती आहे. दरम्यान, या चित्रपटाद्वारे विक्रांत मेस्सी आणि शनाया कपूरची जोडी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. हा चित्रपट प्रसिद्ध लेखक रस्किन बाँड यांच्या कथेवर बेतलेला आहे. या प्रेमकथेत दोन भिन्न पात्रांचा प्रवास पाहायला मिळणार आहे. २०२५ मध्येच हा चित्रपट प्रदर्शित केला जाण्याची शक्यता आहे.
विक्रांत मेस्सीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर २०१३ मध्ये आलेल्या 'लूटेरा' या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर '12वीं फेल','द साबरमती रिपोर्ट', 'कार्गो' गंज यांसारख्या चित्रपटांमध्ये तो मुख्य भूमिकेत झळकला.