Puru kumar : आपल्या संवादफेकीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या राजकुमार यांची ख्याती जगभर आहे. अभिनेते राजकुमार यांनी १९९६ मध्ये जगाचा निरोप घेतला तरीही त्यांच्या अभिनयाची चर्चा आजही केली जाते. एकेकाळी विलनची भूमिका साकारणाऱ्या या नायकाने आपल्या अभिनयाने इंडस्ट्रीतील हिरोंची हवा टाईट केली होती.
पण असं असलं तरी अभिनय क्षेत्रात प्रसिद्धी मिळवणाऱ्या सेलिब्रिटींप्रमाणे त्यांच्या मुलांना लोकप्रियता मिळालेली नाही. या सेलेब्रिटी किड्सना स्वत: ची ओळख निर्माण करण्यासाठी आजही संघर्ष करावा लागत आहे.
बॉलीवूडमध्ये ज्या कलाकारांचे नाव आदरानं घेतले जाते त्यात राज कुमार यांचा देखील समावेश आहे, पण त्यांच्या मुलाला हिंदी चित्रपट विश्वामध्ये वेगळी ओळख मिळवता आली नाही. हमारा दिल आपके पास है', 'मिशन कश्मिर' सारख्या चित्रपटांतून पुरु राजकुमार दिसला होता. पण आपल्या वडिलांसारखा स्टारडम त्याला टिकवता आलं नाही.
पहिल्या हिट अँड रनचा शिकार -
साधारणत: १९९३ च्या डिसेंबरमध्ये थंडीच्या दुलईत मुंबई गारठलेली होती.वेळ रात्रीचे साडे तीन वाजले होते. तेवढ्यात एक आलिशान इम्पोर्टेड कार वेगाने बांद्र्याच्या रोडवरून सुसाट वेगाने निघाली. अचानक चालकाचं गाडीवरून नियंत्रण सुटलं. गाडी वेडीवाकडी एका फुटपाथवर चढली. तिथे पाच लोक झोपली होती. गाडी त्यांना चिरडून निघून गेली. तीन जणांचा मृत्यू झाला. त्यातील दोघेजण गंभीर जखमी झाले. गाडीच्या चाकाखाली अडकलेल्या गंभीर जखमी लोकांना तसंच तडफडत ठेवून चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. ती आलिशान इम्पोर्टेड गाडी पुरुची होती. पण पुराव्याअभावी हे प्रकरण न्यायालयाबाहेरच निकाली काढण्यात आल्याने खटला बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.