'स्टुडंट ऑफ द इअर' या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या आलिया भट्टनेबॉलिवूडमध्ये आपली हक्काची जागा निर्माण केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिची कायमच चर्चा रंगत असते. यामध्येच तिचा आगामी गंगुबाई काठियावाडी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यापासून आलिया सातत्याने चर्चेत येत आहे. सध्या आलिया या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी असून एका कार्यक्रमात तिने तिच्या करिअरविषयी मोठा खुलासा केला आहे.
'गंगुबाई काठियावाडी'च्या निमित्ताने आलिया वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. त्यातच तिने अलिकडे एका कार्यक्रमात बोलत असताना पुढील १० वर्षात तिचा करिअर प्लॅन काय असेल हे सांगितलं आहे. विशेष म्हणजे तिने दिलेल्या माहितीनुसार, आलिया येत्या काळात अभिनयाला रामराम करत अन्य क्षेत्रात नशीब आजमावणार आहे.
आलियाने घेतला अभिनय सोडायचा निर्णय?
"जर मी एक निर्माता आहे आणि त्यातून मला फायदा मिळतोय तर सहाजिकच ती माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. पण, फक्त पैशांसाठी मला हे काम करायचं नाही. तर, एका ठराविक ठिकाणी मी पोहोचल्यानंतर जर मी माझ्यातील नव्या टॅलेंटला वाव देत असेल तर त्या गोष्टीला अर्थ आहे", असं आलिया म्हणाली.
पुढे ती म्हणते, "जे लोक क्रिएटिव्ही करतात त्या लोकांपैकी एक भाग व्हायला मला नक्कीच आवडेल. मला क्रिएटिव्ह पद्धतीने एखाद्या प्रोजेक्टवर काम करणं, दिग्दर्शक, लेखक यांच्यासोबत काम करायला आवडेल. आणि, कदाचित मला कायमस्वरुपी चित्रपटांमध्ये काम करायचं नाही. ज्या कामात मी कन्फर्टेबल आहे ते काम करायला मला जास्त आवडेल. जर तुम्ही मला पुढील १० वर्षातील माझे करिअर प्लॅन विचाराल, तर मला माझं स्वत:चं प्रोडक्शन हाऊस सुरु करायचं आहे."
दरम्यान, आलियाची ही मुलाखत सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. इतकंच नाही तर, आता आलिया गंगुबाई काठियावाडीनंतर अभिनयाला रामराम करणार का असा प्रश्नही नेटकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिची जोरदार चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे डार्लिंग्स या चित्रपटातून आलिया निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत असल्याचं सांगण्यात येतं.