फिल्मी दुनियेतील सेलिब्रिटींसाठी वाद नवे नाहीत. काही जण या वादातून अमाप प्रसिद्धी मिळवतात तर अनेकजण आपलं करिअर बर्बाद करून घेतात. होय, आज आम्ही अशाच एका अभिनेत्रीबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. कॉन्ट्रोव्हर्सीत अडकली अन् करिअर उद्ध्वस्त करून बसली, असंच तिच्याबद्दल म्हणावं लागेल. बॉलिवूडमध्ये बऱ्यापैकी ओळख निर्माण करून पुढे एका वादाने तिचं अख्ख करिअर संपलं. तिचं नाव अलीशा खान. (Bollywood Actress Alisha Khan)
उत्तर प्रदेशच्या गाझियाबादेत राहणाऱ्या अलीशा खानने (Alisha Khan) मॉडेलिंगपासून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. सलग 12 सुपरहिट म्युझिक व्हिडीओ दिल्यानंतर फिल्मी दुनियेतही तिची चर्चा सुरू झाली आणि या जोरावर तिला बॉलिवूडमध्येही एन्ट्री मिळाली. ‘माय हसबण्ड वाईफ’ या सिनेमातून तिने डेब्यू केला. अर्थात तिचा हा डेब्यू सिनेमा काहीही कमाल दाखवू शकला नाही. पहिला चित्रपट आपटला, तशी अलीशा बॉलिवूडमधून जणू गायब झाली. यानंतर 7 वर्षांनी रवीना टंडनच्या ‘मात्र’ या सिनेमात तिला संधी मिळाली.
अलीशा आणि वादांचं जुनं नातं होतं. करिअरपेक्षा ती वादांमुळेच अधिक चर्चेत राहिली. इमरान हाश्मीसोबत ‘आईना’ या सिनेमात अलिसाने काम केलं. हा सिनेमा कधीच रिलीज होऊ शकला नाही. पण हो, या चित्रपटाच्या निमित्ताने तिच्या को-स्टारसोबतच्या अफेअरच्या चर्चा मात्र चांगल्याच गाजल्या होत्या.
याशिवाय अलीशा एका मोठ्या कॉन्ट्रोव्हर्सीत अडकली होती. या कॉन्ट्रोव्हर्सीने तिचं आयुष्य बर्बाद केलं. होय, अलीशाच्या बॉयफ्रेन्डने तिचा MMS इंटरनेटवर व्हायरल केला. खासगी व्हिडीओ लीक झाल्यावर खरं तर अलीशाने बॉयफ्रेन्डला कोर्टात खेचण्याची तयारी सुरू केली. बदनामीच्या भीतीने घरच्यांनी तिला अडवलं, पण अलीशा एफआयआर नोंदवण्यासाठी पोलिस ठाण्यात गेली. मग काय, घरच्यांनी तिला घरातून हाकलून देत, तिच्यासोबतचे सर्व संबंध तोडले. या घटनेनंतर अलीशाच्या डोक्यावर ना छप्पर होतं, ना कुणाचा आधार. रस्त्यांवर भटकायची वेळ तिच्यावर आली. मंदिरात, आश्रमात दिवस काढत ती तगली. एका मुलाखतीत खुद्द अलीशाने हा खुलासा केला होता.
आता अलीशा कुठे आहे तर तिने एका टीव्ही पत्रकारासोबत लग्न केल्याचे कळतेय. एका चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिची या पत्रकारासोबत भेट झाली आणि दोघांनी लग्न केलं. आता अलीशा ना चर्चेत दिसत, ना वादात. तिच्या खासगी आयुष्याबद्दलही कुणालाही ठाऊक नाही.