Amy Jackson: 'एक दिवाना था' आणि 'सिंग इज ब्लिंग' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करून अभिनेत्री एमी जॅक्सनने (Amy Jackson) तिच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. आपल्या बोल्ड, बिनधास्त आणि दिलखेचक अदांनी चाहत्यांना वेड लावणारी अभिनेत्री एमी जॅक्सन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अगदी काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्रीने ब्रिटिश अभिनेता आणि संगीतकार एडवर्ड जॅक पीटर वेस्टविकसोबत लग्न केलं. इटलीतील अमाल्फी बीचवर ख्रिश्चन रितीरिवाजानूसार त्यांनी डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं. अशातच आता त्यांनी चाहत्यांसोबत आनंदाची बातमी दिली शेअर केली आहे. वयाच्या ३२ व्या वर्षी अभिनेत्री दुसऱ्यांदा आई होणार आहे.
नुकतेच या जोडप्याने सोशल मीडियावर त्यांचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसते आहे. त्यामुळे लवकरच एमी आणि एडवर्डच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. फोटोंमध्ये अभिनेत्री एमी जॅक्सनने फोटोंमध्ये पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे तर तिचा पती एड पांढरा टी-शर्ट आणि काळ्या रंगाच्या जिन्समध्ये पाहायला मिळतोय. सोशल मीडियावर एमी आणि एडवर्ड दोघांनीही हे फोटो शेअर केले आहेत. त्यावर चाहत्यांनीत्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
एमी आणि एड हे मागील काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याचे वृत्त समोर येत होते. त्याआधी एमी जॅक्सनने बिझनेसमॅन जॉर्ज पानायियोटौसोबत एंगेजमेंट केली होती. जॉर्जने २०१९ मध्ये एमीला प्रपोज केलं होतं. त्यानंतर दोघे लिव्ह इन रिलेशन शिपमध्ये राहत होते. त्याच दरम्यान अभिनेत्रीला दिवस गेले. त्यांना अँड्रियास नावाचा मुलगाही आहे. पण, त्यानंतर काही वैयक्तिक कारणांमुळे दोघांनी नात्याला पूर्णविराम दिला आणि ते वेगळे झाले. यानंतर एमीने एडवर्ड वेस्टविकला डेट करायला सुरुवात केली. २०२२ मध्ये त्यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी एडवर्ड वेस्टविक आणि एमी जॅक्सनने ऑगस्टमध्ये लग्नबंधनात अडकले.