सध्या देशभरातील वातावरण श्रीराममय झाले आहे. २२ जानेवारीला रामाची नगरी अयोध्या येथे रामललाची मूर्ती प्रस्थापित होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. रामाच्या गजरात अयोध्या नगरी दुमदुमणार आहे. दरम्यान लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आपल्या पतीसह या सोहळ्याला हजेरी लावणार आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्रीचा जन्म अयोध्येतच झाला आहे.
प्रभू श्रीरामाच्या अयोध्या नगरीत जन्माला येणं म्हणजे भाग्यच. २२ जानेवारी रोजी राम मंदिराच्या उद्घाटनासाठी विविध क्षेत्रातील दिग्गजांना आमंत्रण देण्यात आलं आहे. अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, कंगना रणौतसह अनेक बॉलिवूडकर या सोहळ्यासाठी उपस्थित असणार आहेत. यामध्ये अभिनेत्री अनु्ष्का शर्माचाही (Anushka Sharma) समावेश आहे. यानिमित्ताने अनुष्का शर्मा पती विराट कोहलीसोबत (Virat Kohli) आपल्या जन्मगावी येणार आहे. 1 मे 1988 रोजी अयोध्येच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये अनुष्का शर्माचा जन्म झाला. अनुष्काचे वडील अजय कुमार शर्मा हे निवृत्त सैन्य अधिकारी आहेत. ते भारतीय सैन्याच्या डोगरा रेजिमेंटमध्ये होते. त्यावेळी त्यांची पोस्टिंग अयोध्येत होती. यामुळे अनुष्काचा जन्म अयोध्येचा आहे.
काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि अनुष्का शर्माला राम मंदिर उद्घाटनाचं आमंत्रण मिळालं. याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनुष्का पती विराटसह या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. तसंच सध्या अनुष्का दुसऱ्यांदा गरोदर आहे. अशा वेळी रामाचं दर्शन होणार असल्याने ती खूश आहे.