Bhagyashree Patwardhan : दूरदर्शनवरील एका मालिकेत काम करून चित्रपटाची ऑफर येणं असं मोजक्याच लोकांच्या बाबतीत घडलं असेल. ज्या कलाकारांना दूरदर्शनवरून मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली, ते आज यशाच्या शिखरावर आहेत. पण काही कलाकार असे आहेत ज्यांना मोठ्या पडद्यावर काम करण्याच्या ऑफर्स मिळाल्या खऱ्या पण ते इंडस्ट्रीत आपला जम बसवण्यास अपयशी ठरले. आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत.
'मैंने प्यार किया' या चित्रपटातील सुमनची भूमिका साकारणारी अभिनेत्री तुम्हाला आठवते का. ही भूमिका साकारणाऱ्या भाग्यश्री पटवर्धनने तिच्या सौंदर्य आणि अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
साधारणत: १९८९ मध्ये ‘मैंने प्यार किया’ हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात आला. जवळपास ३३ वर्ष उलटूनही या चित्रपटाची क्रेझ आजही कायम आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहे. या चित्रपटमध्ये सलमान खान आणि भाग्यश्री पटवर्धन ही फ्रेश जोडी चाहत्यांच्या भेटीला आली. मराठमोळ्या भाग्यश्रीनं पहिल्याच हिंदी सिनेमातून तिच्या कामाची छाप पाडत अनेक पुरस्कारांवर नाव कोरलं.
मालिकेनंतर चित्रपटांची लागली रांग -
भाग्यश्रीने अमोल पालेकर यांच्या 'कच्ची धुप' या मालिकेतून ॲक्टींग डेब्यू केला होता. तिचा अभिनय पाहून अमोल पालेकर यांनी तिला चित्रपटात येण्यास सुचवले. यानंतर 'मैने प्यार किया' या चित्रपटातून झळकलेल्या भाग्यश्रीने सर्वांचीच मने जिंकली.या मालिकेत भाग्यश्रीने सर्वात मोठी बहिणी अलकाची भूमिका साकारली होती. ज्यात तिने किशोरवयीन मुलीची भूमिका केली होती. १९८७ मध्ये दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या या मालिकेत भाग्यश्रीच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं. तिच्या साध्या आणि सुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांची मन जिंकली. सध्या भाग्यश्री अभिनयापासून दूर आहे. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
या चित्रपटानंतर सलमानचे करिअर उंचावले परंतू भाग्यश्रीने बालपणीचा मित्र आणि बिझनेसमन हिमालय दासानीसोबत १९९० मध्ये लग्न केलं. यानंतर तिनं अभिनयापासून लांब राहणं पसंत केलं. या दोघांना अवंतिका आणि अभिमन्यू ही दोन मुले आहेत. भाग्यश्रीचा मुलगा सुद्धा एक उत्तम अभिनेता आहे.