Women Reservation Bill । नवी दिल्ली : महिला आरक्षण विधेयक मंजूर करून महिला वर्गाला खुशखबर देण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली असून मोदी सरकारने पहिल्याच दिवशी देशभरातील महिलांना एक मोठं गिफ्ट दिलं. हा निर्णय महिला सक्षमीकरणासाठी अत्यंत फायदेशीर असल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी संध्याकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत संसदेत ३३ टक्के महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी देण्यात आल्याचे कळते. अनेकांनी यावर आपापली प्रतिक्रिया दिली. २०२४ ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतला असल्याची टीकाही होत आहे. अशातच बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताने सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करताना राजकारणात सक्रिय होणार असल्याचे संकेत दिले.
नवीन संसदेच्या पहिल्या सत्रादरम्यान पंतप्रधान मोदींनी हे पाऊल उचलले ही एक चांगली गोष्ट आहे. हा प्रगतशील विचार असून मी लहानपणापासूनच राजकारणात येण्याचा विचार केला होता, असे ईशाने सांगितले. ती ANI या वृत्तसंस्थेशी बोलत होती. "कोणतेही नवीन काम सुरू करताना लक्ष्मीपासून सुरूवात होत असते. त्यामुळे मला वाटते की, भारत किती विकसित देश होत चालला आहे हे यातून दिसते. कारण आपण लक्ष्मीवर जास्त लक्ष केंद्रीत करतो आहोत", असेही ईशाने सांगितले.
तसेच मला राजकारण लहानपणापासून आवडत असल्याचे तिने राजकारणात येणार का या प्रश्नावर म्हटले. याशिवाय माझे कुटुंब राजकारणात सक्रिय आहे, त्यामुळे तुम्ही मला २०२६ मध्ये या ठिकाणी पाहू शकाल. जुनी संसद ही इंडियाची, हिंदुस्तानची होती आता आहे ती भारताची आहे. ही इमारत बांधण्यामध्ये भारतीय शिल्पकारांचा मोठा हात आहे. महिला आरक्षण विधेयक पास होईल याची मला खात्री असून सगळ्यांना देखील तेच हवे आहे, असे ईशाने स्पष्ट केले.
महिला आरक्षण विधेयक म्हणजे नक्की काय? महिला आरक्षण विधेयक एक घटनादुरुस्ती विधेयक आहे, जे भारतातील लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३% आरक्षणाची तरतूद करते. हे विधेयक १९९६ मध्ये पहिल्यांदा मांडण्यात आले होते, मात्र ते आजतागायत मंजूर झालेले नाही. भारतीय राजकारणात महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देणे, हा महिला आरक्षण विधेयकाचा उद्देश आहे. भारतात २०२३ मध्ये लोकसभेतील महिलांचा सहभाग केवळ १४.५% आहे, जो जगातील सर्वात कमी आहे. महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यामुळे महिलांचे प्रतिनिधित्व वाढेल आणि त्या धोरणनिर्मितीत अधिक प्रभावी भूमिका बजावू शकतील, अशी अपेक्षा आहे.