Join us  

आईचं निधन अन् लगेच लग्न, कोलमडून गेली होती जुही चावला; सासूचं कौतुक करत म्हणाली, "त्यांनी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 4:24 PM

अभिनेत्री जुही चावला आणि उद्योगपती जय मेहता यांच्या सुखी संसाराला २९ वर्ष पूर्ण झाली आहेत.

Juhi Chawla : अभिनेत्री जुही चावला आणि उद्योगपती जय मेहता यांच्या सुखी संसाराला २९ वर्ष पूर्ण झाली आहेत.  माध्यमांसमोर जुही चावला आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलणं कायमच टाळत असते. नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या लग्नाविषयी एक किस्सा सांगितला आहे. त्यामुळे बॉलिवूडची किरण सध्या चर्चेत आली आहे.

९० च्या दशकात आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे जुही चावला. त्याकाळी जुही बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानावर होती. आपल्या प्रसिद्धीच्या काळात तिने स्वत:ला अभिनयापासून दूर केलं. त्यानंतर जुही चावला जय मेहतांसोबत लग्नबंधनात अडकली. त्यावेळेस घडलेला एका किस्सा सांगत अभिनेत्रीने तिच्या आठवणींना उजाळा दिला.  गुजरात चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅंड इंडस्ट्री सोबत संवाद साधताना तिने आपल्या सासूबाईंबद्दल काही गोष्टी शेअर केल्या आहेत. 

काय म्हणाली जुही चावला? 

या मुलाखतीत जुही म्हणाली, "ज्यावेळेस माझं लग्न ठरलं तेव्हा मी माझ्या करिअरमधील महत्वाच्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. अशातच माझी आई मला सोडून गेली. माझी आई गेल्याचं दु:ख मला सहन होत नव्हतं. जसजशी माझ्या लग्नाची तारीखही जवळ येत होती तेव्हा माझ्या मनात नको नको ते विचार येत होते. मला वाटत होतं माझी आईच होती जिच्यावर मी जीवापाड प्रेम करत होते. ती माझी आई देखील मााझ्यापासून लांब गेली. आता माझं करिअरही जाईल. या सगळ्या विचारांनी माझ्या डोक्यात काहूर माजला होता. नेमकं काय करावं?  मला सूचत नव्हतं. एकेदिवशी मला हे सगळं असह्य झालं आणि मी माझ्या सासूबाईंसमोर ढसाढसा रडू लागले. माझ्या लग्नाविषयी मी त्यांच्याकडे बोलले तेव्हा त्यांनी होकार दिला आणि आमचं लग्न मोजक्या पाहूण्यांच्या उपस्थितीत करण्याचा निर्णय घेतला". 

त्यासोबत आपल्या सासूबाईंविषयी बोलताना जुही म्हणाली, "त्यांनी जवळपास २००० निमंत्रण पत्रिका ज्या पाहुण्यांना देण्यात आल्या होत्या त्या रद्द केल्या. मला माझं लग्न साधेपणातच करायचं होतं. त्यामुळे अवघ्या ८० ते ९० लोकांच्या उपस्थितीत आमचं लग्न पार पडलं".

टॅग्स :जुही चावला बॉलिवूडसेलिब्रेटी वेडिंग