कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. अभिनेत्रीचा हा सिनेमा रिलीजआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कंगनाने या सिनेमात दाखवल्या काही दृश्यांमुळे विशिष्ट समुदायाने आक्षेप घेतला आहे. इतकंच नव्हे तर सेन्सॉर बोर्डानेही अजून सिनेमाला प्रमाणपत्र दिलं नाहीय. त्यामुळे या सर्व गोंधळात रिलीजला अवघे पाच दिवस असताना कंगनाच्या 'इमर्जन्सी'ची डेट पुन्हा पुढे ढकलण्यात आलीय. याविषयी अभिनेत्रीने संताप व्यक्त केलाय.
'इमर्जन्सी'चं प्रदर्शन पुन्हा पुढे गेल्याने कंगना नाराज
कंगना राणौतने शुभांकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये याविषयी तिचं मत व्यक्त केलं. कंगना म्हणाली, "माझ्याच सिनेमावर इमर्जन्सी लावण्यात आलीय. ही खूप निराशाजनक परिस्थिती आहे. मला आपल्या देशाबद्दल निराशेची भावना दाटून आलीय. आपण किती घाबरत राहणार? मी अत्यंत स्वाभिमानाने हा सिनेमा बनवलाय. CBFC ने सिनेमाचं प्रमाणपत्र अडवून धरलंय. परंतु मला 'इमर्जन्सी' सिनेमा कोणत्याही कटविना रिलीज करायचाय. यावर मी ठाम आहे."
मी विनाकट सिनेमा रिलीज करणारच: कंगना
कंगना पुढे म्हणाली, "याविरुद्ध कोर्टात जाऊन सिनेमाला एकही कट न देता मी रिलीज करेन. सिनेमात माजी प्रधानमंत्रींची हत्या सुरक्षारक्षकाद्वारे केली गेल्याचं दाखवलं आहे. हा प्रसंग सिनेमात न दाखवण्याचा माझ्यावर दबाव आहे." अशाप्रकारे कंगनाने 'इमर्जन्सी' सिनेमाबद्दल तिचं रोखठोक मत व्यक्त केलंय. दरम्यान सेन्सॉर प्रमाणपत्रच नसल्याने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आलीय. आता सिनेमा नव्या तारखेला कधी रिलीज होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.