अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि करीना कपूर (Kareena Kapoor) यांची लव्हस्टोरी सगळ्यांनाच माहित आहे. जवळपास ५ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ही जोडी विभक्त झाली. मात्र, त्यांच्या प्रेमाची चर्चा आजही नेटकऱ्यांमध्ये रंगते. एकेकाळी कलाविश्वातील मोस्ट लव्हेबल कपल म्हणून या जोडीकडे पाहिलं जायचं. त्यातच करीना, शाहिदच्या प्रेमात इतकी आकंठ बुडाली होती की तिने तिच्या आईचा विरोध सुद्धा पत्करला होता. इतकंच नाही तर तिने शाहिदसाठी तिची आवडती गोष्ट सुद्धा सोडली होती.
कलाविश्वात करीना आणि शाहिद यांचं प्रेमप्रकरण खूप गाजलं. अगदी ही जोडी एकमेकांशी लवकरच लग्न करेल असंही म्हटलं जात होतं. मात्र, त्यांच्या नात्याच सगळं काही सुरळीत सुरु असतानाच अचानकपणे या दोघांचा ब्रेकअप झाला. जब वी मेट सिनेमाच्या शूटिंग दरम्यान त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे सगळ्यांनाच धक्का बसला होता.
करीना आणि शाहिद यांचं नातं अभिनेत्रीच्या आईला कधीच मान्य नव्हतं. त्यामुळे या नात्याला त्यांनी कायम कडाडून विरोध केला. मात्र, आईचा विरोध पत्करुनही करीना शाहिदला डेट करत होती. यामध्येच करीनाने शाहिदसाठी स्वत:मध्ये अनेक बदल केले होते. हे बदल इतके होते की त्यासाठी तिने तिचे आवडते पदार्थ सुद्धा सोडले होते.
शाहिदची देवावर खूप श्रद्धा आहे त्यामुळे तो कायम पूजा, उपवास करत असतो. इतकंच नाही तर तो नॉनव्हेज सुद्धा खात नाही. त्याच्याच मुळे करीनाने सुद्धा नॉनव्हेज खाणं बंद केलं होतं. परंतु, शाहिदसाठी स्वत:च्या जीवनशैलीत, खाण्यापिण्याच्या पद्धतीमध्ये असा बदल करणं करीनाच्या आईला मान्य नव्हता. याविषयी करीनानेच खुलासा केला होता.
शाहिद त्यावेळी फारसा प्रसिद्ध अभिनेता नव्हता. आणि, मी त्यावेळी टॉप अॅक्ट्रेस होते. म्हणूनच, मी त्याला डेट करणं आईला मान्य नव्हतं. तसंच मी त्याच्यासाठी स्वत:मध्ये काही बदल केले होते हे सुद्धा तिला पटलं नव्हतं, असं करीनाने सांगितलं होतं. दरम्यान, शाहिद आणि करीनाचा अचानकपणे ब्रेकअप झाला. त्यामागचं कारण, अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. या ब्रेकअपनंतर करीनाने सैफ अली खानसोबत लग्न केलं. तर, शाहिदने मीरा राजपूतसोबत संसार थाटला.