Kriti Sanon: साजिद नाडियाडवाला यांच्या 'हिरोपंती' या चित्रपटातून अभिनेत्री क्रिती सनॉन (Kriti Sanon) हिने इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. सध्याच्या घडील बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींमध्ये तिने आपलं स्थान निर्माण केलं आहे. क्रितीने 'बरेली की बर्फी', 'लुका छुपी' आणि 'भेडिया' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसह फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वतःसाठी एक वेगळीच छाप उमटवली आहे. अलिकडेच क्रितीने पहिल्यांदाच हिंदी सिनेसृष्टीतील नेपोटिझमवर भाष्य केलं आहे.
गोवा येथे सुरू असलेल्या '५५ व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'मध्ये क्रिती सनॉन सहभागी झाली होती. या कार्यक्रमात ती बॉलिवूडमधील घराणेशाहीवर स्पष्टपणे बोलली आहे. त्यादरम्यान क्रिती म्हणाली, "मला वाटतं नेपोटिझमसाठी इंडस्ट्री जबाबदार नाही. मीडिया आणि प्रेक्षकांमुळे हा मुद्दा सातत्याने चर्चेत येतो. मीडिया स्टार किड्सच्या संबंधित काय माहिती देतेय, हे प्रेक्षकांना पाहिजे असतं. कारण त्यांना या सगळ्यात रूची आहे. त्यामुळे प्रेक्षकांना स्टार किड्स संबधी जाणून घ्यायची उत्सुकता असते. म्हणून इंडस्ट्री त्यांना घेऊन काम करते. हे एक न थांबणार चक्र आहे. परंतु मला वाटतं की जर तुमच्यामध्ये टॅलेंट आहे तर तुम्ही त्या ठिकाणी नक्कीच पोहणार. शिवाय तुमच्यात ते कौशल्यच नसेल तर मग अवघड आहे."
पुढे अभिनेत्री म्हणाली, "जर तुमचा बॅकग्राउंड फिल्म इंडस्ट्रीतील नसेल तर मग तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागणार. जी संधी तुम्हाला पाहिजे असते ती मिळायला बराच वेळ जातो. शिवाय स्वत: चा फोटो मॅगझीनच्या कव्हरवर येण्यासाठीही संघर्ष करावा लागतो. इथे प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष आहे. परंतु १-२ चित्रपट केल्यानंतर तुम्ही मेहनत करत राहिलात तर कोणतीच गोष्ट तुम्हाला रोखू शकत नाही."