Join us  

डोक्यावर पदर, भोजपुरी भाषा अन्...; 'लापता लेडीज'साठी अभिनेत्रीला करावी लागली तारेवरची कसरत, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 2:36 PM

बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या 'लापता लेडीज' या चित्रपटाची अजुनही सगळीकडेच चर्चा होताना दिसते.

Nitanshi Goel : बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या 'लापता लेडीज' या चित्रपटाची अजुनही सगळीकडेच चर्चा होताना दिसते. किरण राव दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिवर चांगलीच कमाई केली. शिवाय या सिनेमातील पात्रांचंही भरभरून कौतुक करण्यात आलं. 

या चित्रपटात अभिनेत्री नितांशी गोयल, प्रतिभा रांता, स्पर्श श्रीवास्तव  आणि रवि किशन यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले. पण सोशल मीडियावर या चित्रपटापेक्षा १६ वर्षाच्या अभिनेत्रीची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली. ही अभिनेत्री म्हणजे नितांशी गोयल. पण नितांशी नेमकी आहे कोण?  वयाच्या १६ व्या वर्षी तिला आमिरच्या चित्रपटात काम करण्याची संधी कशी मिळाली?  असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. 

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने याबाबत खुलासा केला. या मुलाखती दरम्यान नितांशी म्हणाली, "माझ्याकडे ऑडिशनसाठी तीन सीन आले होते.  त्यावेळी मला माहितही नव्हतं की ही आमिर सरांची फिल्म आहे आणि किरण राव त्याचं दिग्दर्शन करणार आहेत. मी फक्त तीन पानं वाचली. ते तीन सीन वाचून मी इतकी प्रभावित झाले की, कुठल्याही परिस्थितीत मला या चित्रपटात काम करायचं होतं. जशी सिनेमाची स्क्रिप्ट माझ्या हातात आली, मी विचार केला मला या रोलसाठी चांगली तयारी करायची आहे." 

शिवाय नितांशीने या चित्रपटाचा भाग होण्यासाठी प्रचंड मेहनत घेतल्याचं ती सांगते. "काही चित्रपट तसेच मालिका पाहून मी भोजपूरी अ‍ॅसेंटमध्ये कसं बोलावं याचं निरिक्षण केलं. त्यासाठी मी वरुण धवनचा 'सुई धागा' तसेच 'बालिका वधू' सारखी  मालिका पाहिली. त्याचबरोबर वेगवेगळ्या भोजपुरी महिलांचे व्हिडिओज पाहिले. यामागचा माझा एकच उद्देश होता, एकंदरीत या महिलांचं राहणीमान कसं आहे, हे मला जाणून घ्यायचं होतं. कारण या चित्रपटाची कहाणी २००१ मधील आहे आणि माझा जन्म २००६ सालचा आहे. मी तो काळ पाहिलेला नाही त्यासाठी या ऑडिशनच्या वेळी मला तो काळ जगायचा होता. म्हणजे असं वाटेल की मी त्या महिलांचं प्रतिनिधित्व करते. डोक्यावर पदर कसा घ्यावा तसेच बोलण्याची पद्धत कशी असावी या सगळ्या गोष्टींचा मी सराव केला. त्यामुळे माझा ऑडिशन व्हिडिओ पाहताच आमिर खान आणि किरण राव यांनी मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. येवढंच  नाही तर या चित्रपटात मला काम मिळालं हे समजताच माझ्या घरचे अक्षरश: रडू लागले." असं अभिनेत्री म्हणाली.

वर्कफ्रंट- 

नितांशीने 'लापता लेडीज' चित्रपटामध्ये एका विवाहित महिलेचं पात्र साकारलं आहे. चेहऱ्यावर पदर असल्याने दोन नवविवाहित वधुंची अदला-बदल होते आणि त्या वेगवेगळ्या ठिकाणी पोहचतात. अशी या चित्रपटाची रंजक कहाणी आहे. 

नितांशीने  २०१६ साली 'मन मै हे विश्वास' या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यावेळी ती अवघ्या ९ वर्षांची होती. तसेच 'नागार्जून एक योद्धा', 'थपकी प्यार की', 'पेशवा बाजीराव', 'कर्मफल दाता शनी' अशा गाजलेल्या मालिकांमध्ये तिने काम केलं. मालिकांव्यतरिक्त तिने 'इनसाइट एज-२' या वेबसिरिजमध्येही दमदार भूमिका साकारली.

टॅग्स :बॉलिवूडआमिर खानसिनेमासेलिब्रिटीकिरण राव