बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही एक शिवभक्त असून अनेकदा दिसले आहे. 'केदारनाथ' चित्रपटातून पदार्पण करणारी अन् प्रसिद्धीच्या झोतात आलेली सारा तिचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी धार्मिक यात्रा आवर्जुन करते. बुधवारी देखील तिनं ही परंपरा कायम ठेवत उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराला भेट दिली. मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन तिनं दर्शन घेतले तसंच आरती देखील केली. मंदिराच्या गाभाऱ्यातील तिचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर काही नेटकऱ्यांनी ट्रोल केले. याबाबत बोलताना सारानं श्रद्धेचा दाखला देत ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली.
आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सारा सध्या व्यग्र आहे. ती 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटात विकी कौशलसोबत (Vicky Kaushal) झळकणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती अनेक ठिकाणांना भेट देत आहे. तिने बुधवारी महाकालेश्वर मंदिराला भेट दिली. मंदिरातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ट्रोलर्सबद्दल बोलताना सारानं म्हटले, "मी माझे काम खूप गांभीर्याने घेते. मी लोकांसाठी, तुमच्यासाठी काम करत असते. जर तुम्हाला माझे काम आवडत नसेल तर मला वाईट वाटेल. पण हा माझा वैयक्तिक निर्णय आहे, ही माझी वैयक्तिक श्रद्धा आहे. ज्या भक्तीने मी अजमेर शरीफला जाणार त्याच भावनेने मी महाकालला जाईन. मी भेट देत राहिन लोकांना काय बोलायचं आहे ते बोलूद्या. मला काही अडचण नाही."
लक्ष्मण उतेकर यांचा हा चित्रपट २ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. साराने महाकाल मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन पुजारी सांगतात त्याप्रमाणे आरती आणि अभिषेक केला. यापूर्वी सारा आणि विकी लखनौमध्ये होते. तिथं त्यांनी हनुमान सेतू मंदिरात दर्शन घेतले. साराच्या या भूमिकेचं अनेकदा कौतुक झालं आहे, पण तिला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला आहे. तिची शिवभक्ती बघून नेटकऱ्यांनाही कायमच आश्चर्य वाटलं आहे.