Sharmila Tagore: ‘काश्मिर की कली’ म्हणजेच ८० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर (Sharmila Tagore) यांनी आपल्या अभिनयासह सौंदर्यांने चाहत्यांची मनं जिंकली. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. इंडस्ट्रीतील राजेश खन्ना, शम्मी कपूर तसेच धर्मेंद्र यांसारख्या नावाजलेल्या अभिनेत्यांबरोबर त्यांनी स्क्रीन शेअर केली. त्यांच्या चित्रपटांची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये पाहायला मिळते. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आजकाल कलाकारांच्या वाढत्या मानधनाबद्दल भाष्य केलं आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या 'स्क्रीन लाईव्ह' या विशेष कार्यक्रमात बोलताना अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या. या मुलाखतीत शर्मिला टागोर म्हणाल्या, "आज इंडस्ट्रीत पाहायला गेल्यास चित्र पूर्णपणे बदललं आहे. कलाकार जास्त मानधन आणि व्हॅनिटी व्हॅनच्या नादात ते अभिनयापासून दूर चालले आहेत. मला फारच वाईट वाटतं की आजकालचे कलाकार काम करण्याच्या ठिकाणी आपल्यासोबत जेवण बनवणारा, मसाज करणारा माणूस असा एक वेगळा ताफाच घेऊन जातात. मी एक जाहिरात करत होते. तिथे ज्याने माझा मेकअप केला तो माणूस मला सांगत होता की, आजकाल कलाकारांमध्ये त्यांच्या व्हॅनिटीवरून स्पर्धा असते."
पुढे त्या म्हणाल्या, "व्हॅनिटी व्हॅन या पूर्वी प्रायव्हसीसाठी किंवा कपडे बदलण्यासाठी त्यांचा वापर केला जायचा. परंतु आता मिटींगसाठी तसेच आराम करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. या सगळ्यामुळे खरंतर कलाकार अभिनयापासून दूर चालले आहेत. आयुष्यात पैसा महत्वाचा आहेच पण, अशा गोष्टींमुळे तुम्हाला हे कसं कळणार की तुम्ही काय काम करताय? प्रेक्षकांना नक्की काय हवंय? याकडे तुमचं लक्षच राहत नाही."