सध्या सिनेइंडस्ट्रीमध्ये लग्नाचा माहौल आहे. दिवाळीनंतर अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. काही सेलिब्रिटींनी लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. एका बॉलिवूड अभिनेत्रीनेही गुपचूप साखरपुडा केला आहे. तिच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री शाजान पदमसीची लगीनघाई सुरू आहे. नुकतंच तिने आशिष कनकियासोबत साखरपुडा केला आहे. याचे फोटो अभिनेत्रीने शेअर केले आहेत.
शाजान पदमसीने काही दिवसांपूर्वीच साखरपुडा केला आहे. तिचा होणारा नवरा आशिष कनकिया हा कनकिया ग्रुपचा डिरेक्टर आणि मूव्ही मॅक्स सिनेमाज कंपनीचा सीईओ आहे. आता साखरपुडा केल्यानंतर पुढच्या वर्षी ते लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. "तुझ्याबरोबर आयुष्य घालवायला आता वाट पाहू शकत नाही", असं कॅप्शन देत शाजानने साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट करत तिचं अभिनंदन केलं आहे.
शाजान पदमसी ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. काही मालिका आणि सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे. २००९ साली तिने रॉकेट सिंग या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमात तिने रणवीर सिंगबरोबर स्क्रीन शेअर केली होती. दिल तो बच्चा है जी या सिनेमात ती अजय देवगणबरोबर दिसली होती. मसाला, हाऊसफूल २, ऑरेंज, पागलपन, सॉलिड पॅटेल्स या सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे.