कोरोना व्हायरसने अख्ख्या जगात थैमान घातले आहे. भारतातही कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. देशातील कोरोना बाधितांचा आकडा 1000 वर गेला आहे. कोरोनाने एकीकडे हाहाकार माजवला असताना दुसरीकडे काहीजण अतिशय धैर्याने प्रसंगी जीव धोक्यात घालून या संकटाचा सामना करत आहेत. आपले पोलिस बांधव, डॉक्टर्स, नर्सेस डोळ्यांत तेल घालून जागता पहारा देत आहेत. कोरोना रूग्णांवर उपचार करणा-या डॉक्टर व नर्सेसलाही धोका आहे. पण हा धोका पत्करून ते अहोरात्र झटत आहेत. अशात एका अभिनेत्रीनेही अभिनय सोडून नर्स होऊन कोरोना रूग्णांच्या सेवेत स्वत:ला वाहून घेतले आहे.या अभिनेत्रीचे नाव आहे शिखा मल्होत्रा. खुद्द शिखाने सोशल मीडियावर पोस्ट लिहून याबद्दलची माहिती दिली आहे.शिखाने संजय मिश्रासोबत ‘कांचली’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. मात्र त्याआधी 2014 मध्ये तिने वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज आणि नवी दिल्लीतील सफदरगंज हॉस्पिटलमध्ये नर्सिंग कोर्स पूर्ण केला होता. अर्थात हा कोर्स पूर्ण केल्यानंतरही तिने कधीच नर्स म्हणून काम केले नव्हते. पण कोरोनाच्या संकटात तिने गरजूंना आपली सेवा देण्याचा निर्णय घेतला. अभिनय सोडून व्हॉलेंटिअर नर्स म्हणून कोरोना रूग्णांच्या सेवेसाठी ती सज्ज झाली.
बीएमसीकडून परवानगी मिळाल्यानंतर शिखा सध्या मुंबई जोगेश्वरीतील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटलच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये व्हॉलेंटिअर नर्स म्हणून काम पाहत आहे. या हॉस्पिटलमध्ये काम करतानाचे शिखाचे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहेत. तिच्या या कामाचं खूप कौतुक केले जात आहे.
व्हिडीओत ती म्हणते,नर्सिंग ट्रेनिंग केल्यानंतर कधीच नर्स म्हणून काम केले नव्हते, पण आज लोकांना, देशाला माझी गरज आहे. ही गरज ओळखून नर्स म्हणून मी सेवा देण्याचा निर्णय मी घेतला. मी यासाठी अनेक रूग्णालयांत अर्ज केला होता. अशात मुंबई जोगेश्वरीतील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटलने मला सेवेची संधी दिली.