Join us

अरे संसार संसार! शिल्पा शेट्टीने जात्यावर दळलं पीठ, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2024 1:00 PM

शिल्पा शेट्टीला जात्यावर दळण दळताना पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. या व्हिडिओवर कमेंट करत शिल्पावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कायमच चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. ९०च्या दशकात अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी शिल्पा शेट्टी आजही तितकीच लोकप्रिय आहे. ४८व्या वर्षीही शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसते. शिल्पा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

शिल्पा सोशल मीडियावरुन नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अनेक अपडेट्सही शेअर करताना दिसते. सध्या तिच्या अशाच एका व्हिडिओची चर्चा रंगली आहे. शिल्पा शेट्टीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती जात्यावर दळण दळताना दिसत आहे. शिल्पा शेट्टीला जात्यावर दळण दळताना पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. या व्हिडिओवर कमेंट करत शिल्पावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

जात्यावर दळण दळतानाचा व्हिडिओ शेअर करत शिल्पा शेट्टी म्हणते, "राजस्थानला गेले होते तेव्हा मी ही चक्की पाहिली. मला वाटलं की मला पण हे केलं पाहिजे. हा मस्त वर्कआऊट आहे. चक्की चलासन या आसनामुळे हात मजबूत होतात. पचनक्रिया चांगली होते. शरीर लवचिक बनते. पाठीचं दुखणं आणि गरोदरपणात हे आसन टाळा." 

दरम्यान, शिल्पा शेट्टी तिच्या 'इंडियन पोलीस फोर्स' या वेब सीरिजमुळेही चर्चेत आहे. रोहित शेट्टीच्या या सीरिजमधून तिने ओटीटीवर पदार्पण केलं आहे. या वेब सीरिजमध्ये तिने महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.

टॅग्स :शिल्पा शेट्टीसेलिब्रिटी