९०चं दशक गाजवणारी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी अभिनयाबरोबरच तिच्या सौंदर्यानेही प्रेक्षकांना भुरळ घालते. बाजीगर, जानवर, हिंमत, परदेसी बाबू, आग, धडकन अशा चित्रपटांतून शिल्पाने अभिनयाची छाप पाडली. आजही तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहे. शिल्पा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
शिल्पाने शेट्टीने शेअर केलेल्या एका व्हिडिओची सध्या चर्चा रंगली आहे. शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक रील व्हिडिओ शेअर केला आहे. देशभरात वाढलेल्या टोमॅटोच्या किमतीबाबत शिल्पाने हा मजेशीर व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओत ती एक मॉलमध्ये टोमॅटो खरेदी करताना दिसत आहे. पण, टोमॅटोची किंमत बघून तिने ते तसेत ठेवून दिल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. या व्हिडिओला तिने धडकन चित्रपटातील गाण्याचं म्युझिक दिलं आहे. “टोमॅटोचे भाव बघून माझ्या हृदयाचे ठोके वाढत आहेत,” असं कॅप्शन तिने व्हिडिओला दिलं आहे.
शिल्पा शेट्टीने शेअर केलेल्या या व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. एकाने कमेंट करत “बस करा मॅम...शेतकऱ्यांच्या पोटावर का पाय मारत आहात?” असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “मध्यमवर्गीयांना टोमॅटोच्या वाढलेल्या किमतीमुळे फरक पडतो. तुमच्यासारख्या श्रीमंत लोकांनाही पडतो, हे आज कळलं” अशी कमेंट केली आहे. “५-१० हजार कॅफेमध्ये खर्च करता तेव्हा हे आठवत नाही का?” असंही एकाने म्हटलं आहे. याआधीही सुनिल शेट्टीनेही टोमॅटोच्या वाढलेल्या किमतीबाबत वक्तव्य केलं होतं. टोमॅटो महाग झाल्याने जेवणात वापरत नसल्याचं त्याने म्हटलं होतं.
दरम्यान, शिल्पा शेट्टी अनेकदा तिचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. ४८व्या वर्षीही शिल्पा फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसते. शिल्पाने २००९ साली उद्योगपती राज कुंद्राशी विवाहबंधनात अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली. त्यांना दोन मुले आहेत.