कोरोना व्हायरसने सध्या सर्वत्रच थैमान घातले आहे. देशात लॉकडाऊन 17 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. यासह अनेक ठिकाणी लॉकडाऊनच्या तिस-या टप्प्यात दारूची दुकानेही उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे दुकानांच्या बाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. याबाबत बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सिमी गरेवाल यांनी ट्विट केले आहे, जे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.दारू विक्रीला परवानगी दिल्यामुळे सिमी गरेवाल यांनी संताप व्यक्त केला आहे.
आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मला त्या मूर्खाचे नाव जाणून घ्यायचे आहे, ज्याने कोरोनाने हाहाकार माजवलेला असताना देखील दारूची दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. ज्या लोकांना अल्कोहोल घेण्याची सवय आहे, त्यांना कोरोना विषाणूच्या संसर्गाची भीती वाटत नाही. दिल्ली सरकारने दारूचे दर 70 टक्क्यांनी वाढवल्यानंतरही दुकानांबाहेर लोकांची मद्य खरेदीसाठी झुंबड पाहायला मिळते आहे. सिमी गरेवाल इतर सेलिब्रेटींप्रमाणे सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. ब-याच सोशल मीडियावर आपले परखड मत मांडताना दिसतात. नुकतेच सिमी यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात एक व्यक्तीबरोबर वाईनची बाटली घेऊन चालत होता.
इतकेच नव्हे तर दारूच्या नशेत तो इतका धुंद होता की त्याला चालायलाही जमत नव्हते. चालताना मध्येच त्याचा तोल जात होता. या व्हिडीओला त्यांनी समर्पक असे कॅप्शनही दिले होते. त्यांनी म्हटले होते की, लॉकडाऊन हटवण्यात आला आहे. तर दुसरीकडे मुंबईतील दारूच्या दुकानांवर होणारी गर्दी पाहता दुकाने उघडण्याचे आदेश पालिकेने मागे घेतले आहेत.