लावण्यखानी सौंदर्य आणि दमदार अभिनयाने तब्बल तीन दशके चित्रपटसृष्टीवर आधिराज्य गाजवूनही अभिनेत्री स्मृती बिश्वास-नारंग आज अतिशय वाईट आयुष्य जगत आहेत.
‘नेक दिल’, ‘अपराजिता’, ‘मॉडर्न गर्ल’ असे एकापेक्षा एक ब्लॉकबस्टर चित्रपट देत स्मृती बिश्वास यांनी १९३० ते १९६० अशी तीन दशके बॉलिवूडसह बंगाली चित्रपटसृष्टीवर आधिराज्य गाजविले.
कधीकाळी कोट्यवधी रूपयांची संपत्ती नावे असलेल्या स्मृती आज नाशिक येथे एका छोट्याशा घरात वास्तव्य करीत आहेत. मनोरंजन उद्योग विश्वातील लोकांनी पाठ फिरविल्याने त्यांना खूपच हलाखीचे जीवन जगावे लागत असताना वैद्यकीय उपचारासाठीही पदरी पैसे नसल्याची दयनीय अवस्था त्यांची झाली आहे. २८ ठिकाणे बदलणाऱ्या स्मृती बिश्वास काही वर्षांपूर्वी ख्रिश्चन धर्मप्रसाराचे काम करणाऱ्या त्यांच्या बहिणीच्या आश्रयाने मुंबईहून नाशिकला स्थायिक झाल्या. स्मृती यांना दोन अविवाहित मुले असून दोघेही हाताला मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत.
राज कपूर, किशोरकुमार, भगवानदादा, नर्गिस, बलराज साहनी यांसारख्या अभिनेत्यांसोबत स्मृती बिश्वास यांनी जवळपास ९० चित्रपटांमध्ये काम केले. त्यांचे बहुतांश चित्रपट प्रेक्षकांना भावल्याने अनेक पुुरस्कारांनी त्यांना सन्मानितही करण्यात आले. त्यांना ‘दादासाहेब फाळके गोल्डन ईरा’ या मानाच्या पुरस्काराने देखीलही सन्मानित करण्यात आले होते. मात्र दादासाहेबांच्या भूमित त्यांच्यावर एकांतवासात राहण्याची वेळ आली आहे.
स्मृती बिश्वास यांची देशभरात कोट्यवधी रूपयांची मालमत्ता होती. मुंबई, दिल्ली, महाबळेश्वर आदी ठिकाणी त्यांचे बंगले होते. मात्र ती सर्व मालमत्ता केअरटेकर मंडळी तसेच काही नातेवाइकांनी बळकावले. आज त्यांच्याकडे पैसे नसल्याने वैद्यकीय उपचारासाठी लोकांकडून मदत मागण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.