Join us

Sonali Bendre : बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेची कॅन्सरशी झुंज, अमेरिकेत उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 13:48 IST

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅन्सर झाला आहे.ट्विटरवर पोस्ट केलं भावनिक पोस्ट

मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅन्सर झाला आहे. सोनालीची कॅन्सरशी झुंज सुरू असल्याची माहिती तिनं स्वतः ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. सोनालीनं बुधवारी ट्विटरवर एक भावनिक पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. सध्या अमेरिकेतील न्यू-यॉर्क शहरात सोनालीवर उपचार सुरू आहेत.

सोनालीने आपल्या ट्विटर तसंच इन्स्टा अकाऊंटवरील भावनिक पोस्टमध्ये म्हटले आहे की, ''कधी कधी आयुष्यात अनपेक्षित वळणं येतात, ज्याबाबत आपण कधीही विचार केलेला नसतो. मला हायग्रेड कॅन्सर असल्याचे निदान झाले आहे. माझे कुटुंबीय आणि मित्र-परिवार मला आजाराविरोधात लढण्याचे बळ देताहेत. या गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी मी न्यूयॉर्कला आले आहे. सतत शारीरिक वेदना होत असल्याच्या कारणामुळे काही वैद्यकीय तपासण्या केल्या.  यामध्ये मला कॅन्सर झाल्याचे निदान झाले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मी सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. या आजाराला सामोरं जाण्यासाठी मी सज्ज आहे. माझे कुटुंबीय आणि मित्र-परिवार माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत''. 

सोनालीची ही पोस्ट वाचून तिच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. ''सोनाली Get Well Soon', असं म्हणत चाहते  तिच्या आरोग्यासाठी प्रार्थनासाठी करत आहेत.

...आजारामुळे रिअॅलिटी शो सोडला?

'इंडियाज बेस्ट ड्रामेबाज' या रिअॅलिटी शोची सोनाली बेंद्रे परीक्षक होती. मात्र खासगी कारणांमुळे सोनालीने हा शो सोडला. तिच्याऐवजी आता अभिनेत्री हुमा कुरेशी शोमध्ये दिसत आहे. कॅन्सरमुळेच कदाचित सोनालीनं शो सोडण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. 

सोनाली बेंद्रेनं 1994 साली बॉलिवूडमध्ये पर्दापण केले होते. 'आग' सिनेमाच्या माध्यमातून तिनं इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री केली होती. सोनालीनं बॉलिवूडला एका पेक्षा एक हिट सिनेमे दिले आहेत. 'सरफरोश' सिनेमासाठी सोनालीला IIFA अवॉर्ड्समध्ये बेस्ट अॅक्ट्रेस अवॉर्डनं गौरवण्यातही आले आहे. केवळ सिनेसृष्टीतच नव्हे तर जाहिरात क्षेत्रातही सोनालीचं वेगळे स्थान आहे.    

 

टॅग्स :बॉलिवूडसिनेमासोनाली बेंद्रे