सध्याच्या काळात सोशल मीडिया हे अत्यंत प्रभावी माध्यम झालं आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रिटी इन्स्टाग्राम, ट्विटर यांच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु, या माध्यमामधून कलाकारांना जितकं प्रेम मिळतं, तितकाच ट्रोलिंगचा सामनाही करावा लागतो. अलिकडेच 'रश्मी रॉकेट'चा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या ट्रेलरमध्ये तापसी पन्नूचा लूक पाहून काहींनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. तर, काहींनी मात्र, तिची शरीरयष्टी पाहून तिची तुलना पुरुषांबरोबर केली होती. विशेष म्हणजे या ट्रोलर्सला तापसीने तिच्या शैलीमध्ये उत्तरही दिलं होतं. परंतु, आता तिच्यानंतर अभिनेत्री सुप्रिया पाठक यांनी ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे. 'लोकमत ऑनलाइन'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ट्रोल करणाऱ्यांना काही प्रश्न विचारले आहेत.
तापसी पन्नूच्या आगामी 'रश्मी रॉकेट' या चित्रपटात सुप्रिया पाठक यांनी तिच्या आईची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे 'आम्ही जे काम करतो ते दिग्दर्शक सांगतील त्याप्रमाणे आणि भूमिकेची गरज लक्षात घेऊन करत असतो', असं त्यांनी म्हटलं आहे.
"मी मुळात सोशल मीडियावर फारशी अॅक्टीव्ह नाहीये. त्यामुळे ट्रोलिंगविषयी मला फारसं माहित नसतं. पण मला एक प्रश्न कायम पडतो की लोक ट्रोलिंग का करतात? मला एक माहित आहे भूमिकेची जी गरज असते तेच काम आम्ही करत असतो. त्यामुळे हे ट्रोलिंग काय आहे आणि ते का करतात हेच मला समजत नाही", असं सुप्रिया पाठक म्हणाला.
पुढे त्या म्हणतात, "जी भूमिकेची गरज असते तेच आम्ही करत असतो. त्यामुळे प्रथम चित्रपट पाहावा आणि त्यानंतरच आपलं मत द्यावं असं मला प्रामाणिकपणे वाटतं." तापसी पन्नूची मुख्य भूमिका असलेला रश्मी रॉकेट हा चित्रपट येत्या १५ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आकर्ष खुराना दिग्दर्शित या चित्रपटात तापसी एका धावपटूची भूमिका साकारत आहे.
काय आहे चित्रपटाची कथा
ही एका छोट्या गावातल्या तरुण मुलीची कथा आहे. आकर्ष खुराना यांच्याद्वारे दिग्दर्शित 'रश्मी रॉकेट' हा चित्रपट नंदा पेरियासामी यांच्या मूळ कथेवर आधारित आहे. यामध्ये 'रश्मी रॉकेट'ला आपले स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची आणि स्पर्धेत व्यावसायिक रूपाने सहभागी होण्याची संधी मिळते. मात्र, तिला हेही जाणवते की फिनिश लाइन आणि धावणे यामध्ये अनेक संकटे आहेत. अखेरीस ही एथलेटिक स्पर्धा, सम्मान आणि तिच्या व्यक्तिगत लढाईत रूपांतरित होते.