सध्याच्या काळात सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे. त्यामुळेच अनेक सेलिब्रिटी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ट्विट, इन्स्टाग्राम यांचा वापर करत असतात. परंतु, या कलाकारांच्या गर्दीत असेही सेलिब्रिटी आहेत जे अद्यापही सोशल मीडियावर फारसे सक्रीय नसल्याचे दिसून येतात. यामधलंच एक नाव म्हणजे अभिनेत्री सुप्रिया पाठक. अलिकडेच सुप्रिया पाठक यांनी लोकमत ऑनलाइनला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफवरही चर्चा केली. विशेष म्हणजे अजूनही त्या सोशल मीडियावर फारशा सक्रीय का नाहीत या मागचं कारण त्यांनी सांगितलं.
"सध्याच्या काळात सोशल मीडिया हे अत्यंत प्रभावी माध्यम झालं आहे किंवा ती एक काळाची गरज आहे हे मला सगळं मान्य आहे. चाहत्यांसोबत, प्रेक्षकांसोबत जोडून राहण्यासाठी हे उत्तम माध्यम आहे. परंतु, मला माझं आयुष्य खासगी ठेवायला जास्त आवडतं. माझ्या आयुष्यात घडत असलेली प्रत्येक गोष्ट मी जाहीरपणे सांगायलाच हवी हे गरजेचं नाही. किंबहुना, मला सगळ्या गोष्टी उघडपणे सांगणं आवडत नाही", असं सुप्रिया पाठक म्हणाल्या.
बेधडकपणे व्यक्त होणारी तापसी खऱ्या आयुष्यात तशी नाही; सुप्रिया पाठकांनी केली पोलखोल
पुढे त्या म्हणतात, "मी प्रायव्हेट पर्सन आहे. त्यामुळे मला माझ्या आयुष्यातील काही गोष्टी प्रायव्हेट ठेवायलाच आवडतात. आणि, आतापर्यंत मी जे काम केलंय त्यातूनच माझं आयुष्य उलगडलं आहे. मी माझ्या कामातून व्यक्त झाले आहे. त्यामुळे मला चाहत्यांसोबत जोडून राहण्यासाठी कोणत्याही माध्यमाची गरज वाटत नाही".
'ट्रोलिंग का करतात हेच समजत नाही'; सुप्रिया पाठक यांचा नेटकऱ्यांना सवाल
दरम्यान, सुप्रिया पाठक या कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. छोट्या पडद्यावरील 'खिचडी' या मालिकेतील त्यांची हंसा ही भूमिका प्रचंड गाजली होती. तसंच 'रामलीला' या चित्रपटातील त्यांनी साकारलेली भूमिकादेखील वाखाणण्याजोगी होती. लवकरच त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला 'रश्मी रॉकेट' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.