Join us

'मुलांना लहान वयात आपण काय दाखवतोय?' वेब सीरिजमधील आक्षेपार्ह दृश्यांवर सुप्रिया पाठक नाराज

By शर्वरी जोशी | Published: October 13, 2021 5:30 PM

Supriya pathak: गेल्या काही वर्षांमध्ये ओटीटीचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. परंतु, या ओटीटीवर रिलीज होणाऱ्या अनेक चित्रपट, वेब सीरिजमध्ये आक्षेपार्ह दृश्य दाखवले जातात.

ठळक मुद्देवेबसीरिजवर सेन्सॉर बोर्डाचा अंकुश असावा की नसावा यावर कायमच चर्चा रंगताना पाहायला मिळते.

सध्याचा काळ हा ओटीटी प्लॅटफॉर्मचा असल्याचं म्हटलं जातं. लॉकडाउनच्या काळातही याचा प्रत्यय अनेकांनी घेतला. चित्रपटगृह, नाट्यगृह सारं काही बंद असल्यामुळे अनेक चित्रपट ओटीटीवर रिलीज झाले. इतकंच नाही तर गेल्या काही वर्षांमध्ये ओटीटीचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. परंतु, या ओटीटीवर रिलीज होणाऱ्या अनेक चित्रपट, वेब सीरिजमध्ये आक्षेपार्ह दृश्य दाखवले जातात. त्यामुळे अनेकदा अशा वेब सीरिजवर सेन्सॉरची कात्री लागावी अशी मागणी करण्यात येते. मात्र, वेबसीरिजवर सेन्सॉर बोर्डाचा अंकुश असावा की नसावा यावर कायमच चर्चा रंगताना पाहायला मिळते. या चर्चांमध्येच अभिनेत्री सुप्रिया पाठक यांनी वेब सीरिजमधील अशा दृश्यांवर आक्षेप नोंदवला असून "मुलांना आपण लहान वयात काय दाखवतोय?" असा सवाल उपस्थित केला आहे. 'लोकमत ऑनलाइन'ला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. 

"प्रत्येक गोष्टीची  एक ठराविक वेळ ठरलेली असते. त्यानुसार सारं काही व्हावं. ज्या प्रमाणे आपण शाळेत बालवाडीपासून शिक्षणाची सुरुवात करतो आणि मग नंतर हळूहळू एक-एक वर्ग पुढे जातो. त्याप्रमाणे सगळं घडायला हवं. जर तुम्ही एखाद्या पहिलीतल्या मुलाला १० वीचं पुस्तक दिलं तर सहाजिकच तो गोंधळून जाईल. त्याच्यावर राँग इंप्रेशन पडेल. तसंच आपल्या viewership मध्येही असायला हवं. जर वेब सीरिजमधील एखादा सीन डोळ्यांना खटकत असेल तर तो नक्कीच हटवायला हवा. त्यावर मग सेन्सॉर नक्कीच असावं. कारण, मग अशा सगळ्या प्रकारामुळे समाजात चुकीचा मेसेज व्हायरल होतो", असं सुप्रिया पाठक म्हणाल्या.

'मी कामातून व्यक्त होते, सोशल मीडियाची गरज नाही'; सुप्रिया पाठक यांचं रोखठोक मत

पुढे त्या म्हणतात, "मला असं वाटतं ज्या वयात ज्या -ज्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे ते त्याच वयात शिकायला मिळावं. योग्य वयात योग्य गोष्ट शिकायला मिळाली ती त्या मागचा अर्थ नीट उलगडतो. मुळात आपल्यालाच हे समजायला हवं की आपण कोणत्या वयात मुलांना नेमकं काय दाखवतोय. त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच विचार करायची खूप गरज आहे. आता मी सेन्सॉर हा शब्द इथे वापरणार नाही. कारण, बऱ्याचदा सेन्सॉरचाही गैरवापर  होऊ शकतो. सध्याच्या काळात सकारात्मकता निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे."

दरम्यान,  सुप्रिया पाठक या कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांची 'खिचडी' या मालिकेतील भूमिका प्रचंड गाजली होती. तसंच 'रामलीला' या चित्रपटातील त्यांनी साकारलेली भूमिकादेखील वाखाणण्याजोगी होती. लवकरच त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला 'रश्मी रॉकेट' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या १५ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट  ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :वेबसीरिजसिनेमाबॉलिवूडसेलिब्रिटी