अभिनेते मोहनलाल (Mohanlal) हे मल्याळम इंडस्ट्रीतील सुपरस्टार म्हणून ओळखले जातात. मोहनलाला यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळणं म्हणजे अनेकजण मोठं भाग्यच समजतात. अभिनयाव्यतिरिक्त ते निर्माते, पार्श्वगायक, फिल्म डिस्ट्रीब्युटर आणि दिग्दर्शकही आहेत. गेल्या ४ दशकांपासून ते फिल्म इंडस्ट्रीत काम करत आहेत आणि आतापर्यंत त्यांना चार वेळा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. मात्र तुम्हाला माहितीये का साऊथमधील या दिग्गज अभिनेत्यामुळे एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या करिअरमध्ये अडथळा आला. कोण आहे ती अभिनेत्री?
मोहनलाल यांच्यामुळे एका बॉलिवूड अभिनेत्रीला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. तिचं करिअर सुरु होण्यापूर्वीच संपतं की काय अशी भीती होती. तसंच तिला पनौती म्हणजेच अशुभ असंही म्हटलं गेलं. ती अभिनेत्री म्हणजे खुद्द 'एंटरटेन्मेंट क्वीन' विद्या बालन (Vidya Balan) आहे. ही गोष्ट खूप जुनी म्हणजे 2000 सालची आहे विद्याने स्वत:च एका मुलाखतीत याचा खुलासा करत सांगितले होते की, "तेव्हा विद्या साऊथ फिल्मइंडस्ट्रीत पाऊल ठेवत होती. मल्याळम सिनेमातून ती डेब्यू करणार होती. चक्रम या सिनेमासाठी तिला फायनल करण्यात आले होते. तसंच या सिनेमात मोहनलाल आहेत हे पाहूनच तिने होकार दिला होता. दिग्दर्शक कमल यांच्यावर दिग्दर्शनाची धुरा होती. या सिनेमाबद्दल तिने मोठी पोस्टही केली होती. एका अॅड शूटसाठी ती केरळ गेली असता तिने मोहनलाल यांचं नाव ऐकताच सिनेमाला होकार दिला होता. विद्याने ऑडिशनही क्लिअर केली होती."
ती पुढे म्हणाली, "मात्र चक्रम सिनेमाचं एक दोन दिवसांचं शूट पूर्ण होताच दिग्दर्शक कमल आणि मोहनलाल यांच्यात इगो क्लॅश झाले. परिणामी सिनेमा पूर्णच झाला नाही. यामुळे विद्याच्याही करिअरवर गंभीर परिणाम झाला. तिच्या हातातून साईन केलेले तब्बल १२ सिनेमे गेले. तेव्हा साऊथमध्ये कॉन्ट्रॅक्टसारखं काहीच नव्हतं. तिला सगळ्याच सिनेमातून काढण्यात आलं."
मात्र विद्याने हार मानली नाही आणि 2005 साली तिने परिणीता या हिंदी सिनेमातून पदार्पण केलं. विद्याने नंतर तिच्या करिअरमध्ये 'कहानी', 'द डर्टी पिक्चर', 'भूलभूलैय्या', 'डेढ इश्कियाँ', 'लगे रहो मुन्नाभाई' असे हिट सिनेमे दिले.