काल ७० व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचं वितरण झालं. या पुरस्कार सोहळ्यात भारतातल्या सर्वोत्कृष्ट ठरलेल्या विविध कलाकृती आणि कलाकारांचा गौरव करण्यात आला. याच पुरस्कार सोहळ्यात लोकप्रिय अभिनेत्री यामी गौतमचे वडील मुकेश यांना त्यांच्या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वडिलांना त्यांच्या आजवरच्या कारकीर्दीत पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने यामी गौतम भावुक झालेली दिसली.
यामीची वडिलांसाठी खास पोस्ट
यामी गौतमचे वडील मुकेश गौतम यांना त्यांच्या पंजाबी सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामी वडिलांसाठी पोस्ट करुन लिहिते की, "माझ्यासाठी हा खूप भावुक क्षण आहे. कारण माझे वडील मुकेश गौतम यांना त्यांच्या 'बागी दी धी' यासाठी सर्वोत्कृष्ट पंजाबी सिनेमाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. या क्षणी माझ्या भावना मी शब्दात मांडू शकत नाही. मला वडिलांचा खूप अभिमान वाटतोय. माझ्या वडिलांचा आजवरचा प्रवास संघर्षाने भरलेला आहे. तरीही त्यांचा कामाप्रती असलेला प्रामाणिकपणा आणि मेहनत वाखाणण्याजोगी आहे. संपूर्ण कुटुंबाला तुमचा अभिमान आहे बाबा."
७० व्या राष्ट्रीय पुरस्कार
काल ७० व्या राष्ट्रीय पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यावेळी ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारांमध्ये 'वाळवी' सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा म्हणून पुरस्कार घोषित करण्यात आला होता. याशिवाय ‘आणखी एक मोहेंजोदारो’ या ज्येष्ठ लेखक-दिग्दर्शक अशोक राणे यांच्या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट चरित्रात्मक/ऐतिहासिक/संकलन पुरस्कार मिळाला. त्याची निर्मिती राजेश पेडणेकर व गायत्री पेडणेकर यांनी केली आहे. तसेच ‘मर्मर्स ऑफ द जंगल’ला सर्वोत्कृष्ट माहितीपटासह सर्वोत्कृष्ट नॅरेशन व व्हॉइस ओव्हरचा पुरस्कार मिळाला आहे. याची निर्मिती-दिग्दर्शन साहिल वैद्य यांनी केले, तर व्हॉइस ओव्हर सुमंत शिंदे यांनी दिला आहे. सर्वोत्कृष्ट आर्ट्स/कल्चर फिल्मचा पुरस्कार निर्माता-दिग्दर्शक सचिन सूर्यवंशी यांच्या ‘वारसा’ला मिळाला आहे.