नवी दिल्ली - दिवंगत अभिनेते अमजद खान (Amjad Khan) हे बॉलिवूडमधील लोकप्रिय नाव आहे. त्यांच्या अनेक भूमिका या चांगल्याच गाजल्या. विशेषत: 'गब्बर' ही भूमिका सर्वांच्याच कायम लक्षात आहे. अमजद खान यांचा मुलगा अभिनेता शादाब खान याला एक प्रश्न विचारण्यात आला होता की त्याला आपल्या वडिलांचा लकी चार्म म्हणता येईल का?, कारण अमजद यांनी 'शोले' हा सुपरहिट सिनेमा साइन केला त्याच दिवशी शादाबचा जन्म झाला होता. एका मुलाखतीत शादाबने याबाबत खुलासा केला आहे. त्याच्या वडिलांकडे त्याची आई शहला खान यांचा रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यासाठीही पैसे नव्हते. चित्रपट निर्माते चेतन आनंद यांनी त्यांना 400 रुपये देऊन मदत केल्याचे शादाबने म्हटलं आहे.
1975 साली 'शोले' (Sholay) रिलीज झाला होता. चित्रपटाची कथा सलीम-जावेद यांनी लिहिली होती आणि दिग्दर्शक रमेश सिप्पी होते. सुपरहिट असलेल्या या चित्रपटात अमजद यांनी क्रूर डाकू गब्बर सिंगची भूमिका साकारली होती. जी आजही फेमस आहे. या चित्रपटात धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, संजीव कुमार, हेमा मालिनी आणि जया बच्चन यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. 'शोले' हा चित्रपट क्लासिक आणि भारतातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांमधील एक गणला जातो.
शादाब खानने (Shadab Khan) टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, "होय, त्यांच्याकडे पेमेंट करण्यासाठी देखील पैसे नव्हते. जिथे माझा जन्म झाला होता तिथून माझ्या आईला रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यासाठी देखील पैसे नव्हते. ती रडायला लागली होती. माझे वडील रुग्णालयात येत नव्हते, त्यांना त्यांचा चेहरा दाखवायला लाज वाटत होती. चेतन आनंद यांनी त्यांना एका कोपऱ्यात डोकं धरुन बसलेलं पाहिलं, त्यावेळी माझ्या वडिलांनी त्यांची फिल्म ‘हिंदुस्तान की कसम’ केली होती. चेतन आनंद साहेबांनी त्यांना 400 रुपये दिले जेणेकरुन मला आणि माझ्या आईला घरी आणता येईल."
शादाब खानला 'शोले' रिलीज होण्यापूर्वीचाही एक प्रसंग आठवला. तो म्हणाला की, "जेव्हा 'शोले'साठी माझ्या वडिलांकडे गब्बर सिंगची भूमिका आली तेव्हा सलीम खान साहेबांनी त्यांच्या नावाची शिफारस रमेश सिप्पी यांच्याकडे केली. बंगळुरू विमानतळापासून 70 किमी अंतरावर असलेल्या रामगडमध्ये चित्रपटाचे शूटिंग होणार होते. त्याने बंगळुरूला फ्लाइट पकडली आणि त्या दिवशी एवढा गोंधळ झाला की फ्लाइटला 7 वेळा लँड करावे लागले."
शादाब पुढे म्हणाला की, "त्यानंतर जेव्हा विमान धावपट्टीवर थांबले तेव्हा बहुतेक लोक घाबरून फ्लाइटमधून बाहेर पडले पण माझे वडील बाहेर आले नाहीत. पण तो चित्रपट केला नाही तर ते डॅनी साहेबांकडे (डॅनी डेन्झोंगपा) यांच्याकडे परत जातील अशी भीती त्यांना होती. त्यामुळे काही मिनिटांनी ते देखील विमानातून उतरले." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.