बॉलिवूड अभिनेत्री किरण खेर ( Kirron Kher) यांचा आज वाढदिवस. किरण खेर आज त्यांचा 69 वा वाढदिवस साजरा करत आहेत. (Happy Birthday Kirron Kher) अभिनेत्री किरण खेर यांचा 14 जून, 1955 साली शीख कुटुंबात जन्म झाला. किरण खेर यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक चित्रपटांत काम केले. अनेक मालिकांमध्ये त्या दिसल्या. पण आज आम्ही किरण खेर यांच्या करिअरबद्दल नाही तर अनुपम व त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगणार आहोत. किरण व अनुपम यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाची कथा शोभावी अशी आहे. होय, कारण दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले तेव्हा दोघेही आधीच विवाहित होते. ( know about Kirron Kher and Anupam Kher love story)
किरण व अनुपम यांची भेट चंदीगडमध्ये झाली होती. दोघेही चंदीगड थिएटर ग्रूपमध्ये काम करायचे. यादरम्यान दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यापेक्षा दोघांमध्येही काहीही नव्हते. पण पुढे काही वर्षांनी किरण व अनुपम यांना नियतीने पुन्हा एकत्र आणले. अर्थात मधल्या काळात अनुपम यांचेही लग्न झाले होते. किरण तर एका मुलाची आई होत्या. पण इश्क पर जोर नहीं...., म्हणतात ते उगाच नाही.
1980मध्ये किरण चंदीगडवरून मुंबईला आल्या. येथे त्यांची ओळख बिझनेसमॅन गौतम बेरीसोबत झाली. पुढे दोघांनीही लग्न केले. लग्नानंतर वर्षभरातच किरण आई झाली. सिकंदर खेर हा किरण आणि गौतम यांचा मुलगा आहे. सिकंदर चार पाच वर्षांचा असतानाच या लग्नात आपण आनंदी नाही, हे किरण व गौतम दोघांनाही कळून चुकले होते.
तिकडे 1979 मध्ये अनुपम यांनी कुटुंबाच्या आग्रहावरून मधुमालती नामक मुलीसोबत लग्न केले. पण ते दोघेही आपल्या नात्यात आनंदी नव्हते. याचदरम्यान नादिरा बब्बर यांच्या एका नाटकासाठी किरण व अनुपम दोघेही कोलकात्यात गेले. येथे त्यांची अनेक वर्षांनी पुन्हा भेट झाली. नाटक संपल्यावर अनुपम यांनी किरण यांना प्रपोज केले. आधी तर अनुपम मस्करी करताहेत, असे किरण यांना वाटले. पण नंतर आपल्या दोघांचेही एकमेकांवर प्रेम आहे, हे त्यांना कळून चुकले. पुढे दोघेही एकमेकांना भेटू लागले आणि त्यांच्यातील प्रेम वाढत गेले. यानंतर दोघांनीही आपआपल्या पार्टनरसोबत घटस्फोट घेऊन 1985मध्ये लग्न केले. अनुपम यांनी किरण यांचा मुलगा सिकंदर यांना स्वीकारत त्याला आपले नावही दिले.