South Cinema VS Bollywood: महेश बाबू (Mahesh Babu) साऊथचा मोठ्ठा स्टार आहे, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. त्याची अॅक्टिंग, त्याची पर्सनॅलिटी सगळंच डॅशिंग. म्हणून जगभरातील तरूणी त्याच्यावर फिदा आहेत. तो लाखो तरूणांच्या गळ्यातील ताईत आहे. त्याची ही लोकप्रियता बघता, महेश बाबूबॉलिवूडमध्ये डेब्यू करणार, अशा चर्चा म्हणूनच अधूनमधून ऐकायला मिळतात. पण महेश बाबूचा तरी बॉलिवूडमध्ये येण्याचा काहीही इरादा नाहीये. होय, बॉलिवूड मुझे अफोर्ड नहीं कर सकता, असं म्हणत त्यानं जणू बॉलिवूडचा पत्ताच कट केला आहे. (Mahesh Babu on Bollywood) सोमवारी ‘मेजर’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये महेश बाबू बॉलिवूडबद्दल असं काही बोलून गेला की सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.
काय म्हणाला महेशबाबू...बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याचा विचार आहे का? असा सवाल महेश बाबूला या इव्हेंटमध्ये विचारण्यात आला. यावर महेशबाबूनं दिलेलं उत्तर ऐकून सगळेच हैराण झालेत. ‘बॉलिवूडमधून मला अनेक ऑफर्स मिळतात. पण मला वाटतं,बॉलिवूड मला अफोर्ड करू शकणार नाही. त्यांना मी परवडणार नाही. त्यामुळे मी तिथे जाऊन माझा वेळ वाया घालवू इच्छित नाही,’असं महेश बाबू म्हणाला. ‘मला साऊथच्या सिनेमांनी जेवढं काही स्टारडम, यश, प्रेम दिलं आहे, ते भरपूर आहे. मला आणखी स्टारडम नकोय. माझी इंडस्ट्री सोडून दुसरीकडे काम करण्याची माझा विचार नाही. मी नेहमी मोठं व्हायचं आणि भरपूर सिनेमा बनवायचं स्वप्न पाहिलं होतं. माझं स्वप्न आता खरं होत आहे. मी इथेच खूश आहे. मला नेहमीच तेलगू चित्रपटात काम करायचं होतं. भारतातील सर्व लोकांनी ते पाहावेत अशी इच्छा होती.आता असं होतांना दिसतंय आणि याचा मला आनंद आहे. माझी ताकद तेलगू सिनेमे आहेत,’असंही तो म्हणाला.