बॉलिवूडमधील लोकप्रिय कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानच्या आईचं निधन झाल्याची दुःखद बातमी समोर येतेय. फराह खानच्या आईचं नाव मेनका असं होतं. आईचं छत्र हरपल्याने फराह आणि तिचा भाऊ साजिद खान यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मेनका या बालकलाकार हनी इराणी आणि डेसी इराणी यांच्या बहिण होत्या. फराह कायमच विविध पोस्टच्या माध्यमातून आईबद्दल तिच्या चाहत्यांना सांगायची.
काहीच दिवसांपूर्वी फराहच्या आईचा वाढदिवस
या दुःखद घटनेआधी फराहने आईविषयी एक खास पोस्ट लिहिली होती. फराहने लिहिलं होतं की, "आपण कायमच आपल्या आईला गृहीत धरत आलोय. विशेषतः मी जास्तच गृहीत धरलंय. मला गेल्या महिन्यात जाणीव झाली की माझी आई मेनकावर माझं किती प्रेम आहे. ती खूप स्ट्रॉंग आहे. याशिवाय तिच्याइतकी हुशार व्यक्ती मी दुसरीकडे कुठे पाहिली नाही. अनेक सर्जरी होऊनही तिच्यातली विनोदबुद्धी कायम राहिली. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई." अशा शब्दात फराहने आईला शुभेच्छा दिल्या होत्या. १२ जुलैला फराहच्या आईचा वाढदिवस होता.
फराह आणि साजिदवर कोसळला दुःखाचा डोंगर
आईसोबत फराह-साजिद या दोन्ही भावंडांनी संघर्षाचा काळ बघितलाय. फराह-साजिदने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडसारख्या स्पर्धात्मक जगात स्वतःची ओळख मिळवली. या सर्व प्रवासात फराहच्या आईचा त्यांना खूप सपोर्ट असल्याचं दिसतं. फराहचे चाहते आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी फराहच्या आईला श्रद्धांजली वाहिली आहे. याशिवाय फराह-साजिदचं सांत्वन करत त्यांना धीर दिलाय.