सुशांत सिंह राजपूत हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता होता. १४ जून २०२० रोजी आत्महत्या करत सुशांतने जीवनं संपवलं. त्याच्या मृत्यूने चाहत्यांना धक्का बसला होता. 'छिछोरे', 'एम.एस.धोनी : द अनटोल्ड स्टोरी', 'केदारनाथ', 'शुद्ध देसी रोमान्स' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांत त्याने काम केलं होतं. 'दिल बेचारा' हा सुशांतचा शेवटचा सिनेमा ठरला. मुकेश छाबडा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.
मुकेश छाबडा आणि सुशांत एकमेकांचे चांगले मित्र होते. सुशांतच्या आठवणीत मुकेश छाबडा भावुक झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. मुकेश छाबडा यांनी त्यांच्या आईबरोबरचा सुशांतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते दोघेही जेवताना दिसत आहेत. "हा फोटो मिळाला. आई आणि सुशांत बटाट्याचे पराठे एन्जॉय करत आहेत. आताही ते जिथे कुठे असतील असेच एन्जॉय करत असतील," असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मुकेश छाबडा हे दिग्दर्शक असण्याबरोबरच कास्टिंग दिग्दर्शकही आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचं कास्टिंग त्यांनीच केलं होतं. या चित्रपटात ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. 'दिल बेचारा' या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं. या चित्रपटात सुशांत सिंह राजपूतने मुख्य भूमिका साकारली होती.