Join us

exclusive: जावेद जाफरीचा लेक 'या' दिग्दर्शकाला मानतो गुरु; त्यांच्या एका निर्णयामुळे बदललं अभिनेत्याचं नशीब

By शर्वरी जोशी | Published: October 03, 2023 4:08 PM

Meezaan Jafri: या दिग्दर्शकामुळे मीजानच्या आयुष्यात मोठा बदल झाला.

'मलाल' सिनेमातून कलाविश्वात पदार्पण करणारा मीजान जाफरी (Meezaan Jafri) आता साऱ्यांनाच ठावूक झाला असेल. पहिल्याच सिनेमातून या अभिनेत्याने त्याच्यातील अभिनयाची चुणूक सगळ्यांना दाखवून दिली. विशेष म्हणजे मीजान हा अभिनेता जावेद जाफरीचा लेक आहे हे फार कमी जणांना माहित आहे. वडिलांच्या आधाराशिवाय मिजानने कलाविश्वात त्याची ओळख निर्माण करायला घेतली आहे. लवकरच त्याचा 'यरियाँ 2' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने 'लोकमत ऑनलाइन'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याचा कलाविश्वातील गुरु कोण हे सांगितलं.

'यारियाँ' हा सिनेमा गाजल्यानंतर त्याचा पुढील भाग 'यारियाँ 2' हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात मीजान हा शिखर रंधावा ही मुख्य भूमिका साकारत आहे. त्यामुळे त्याने या मुलाखतीमध्ये त्याच्या भूमिकेविषयी आणि एकंदरीत फिल्मी प्रवासाविषयी भाष्य केलं. यावेळी बोलत असताना त्याने कलाविश्वातील कोणती व्यक्ती त्याची गुरु आहे हे त्याने सांगितलं.कलाविश्वात अशी कोणती व्यक्ती आहे जी तुझ्या जवळची आहे आणि तिच्यासोबत तू सगळं शेअर करु शकतोस? असा प्रश्न मीजानला विचारण्यात आला होता. त्यावर त्याने पटकन दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांचं नाव घेतलं.

"संजय लीला भन्साळी (sanjay leela bhansali) हे माझे गुरु आहेत. कारण, त्यांनीच मला सगळ्यात प्रथम इंडस्ट्रीमध्ये लॉन्च केलं. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर तेच एक व्यक्ती आहेत ज्यांच्यासोबत मी सगळं काही शेअर करु शकतो. पण, ते फार सिनिअर आहेत. त्यामुळे अशा काही गोष्टी असतात ज्या मी फक्त माझ्याच वयाच्या व्यक्तींसोबत शेअर करु शकतो. त्या गोष्टी मी त्यांच्यासोबत शेअर करु शकत नाही", असं मीजान म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "संजय सर सोडले तर मग अशी एकही व्यक्ती नाही जी माझ्या खूप जवळ आहे. इंडस्ट्रीमध्ये माझा मित्र परिवार आहे. पण, तो फार क्लोज नाही."

दरम्यान, संजय लीला भन्साळी यांच्या मलाल या सिनेमातून मीजानला पहिला ब्रेक मिळाला. विशेष म्हणजे ज्यावेळी संजय लीला भन्साळी यांनी मीजानला या सिनेमात कास्ट केलं त्यावेळी मीजान हा जावेद जाफरीचा लेक आहे हे त्यांना ठावूक नव्हतं. मीजान याने आतापर्यंत काही मोजक्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'मलाल', 'हंगामा 2', 'मिरांडा बॉईज' या सिनेमांमध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. तर, 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत' या सिनेमांमध्येही त्याने छोटेखानी भूमिका साकारली आहे. 

टॅग्स :मिजान जाफरीसंजय लीला भन्साळीजावेद जाफरीसिनेमा