Satish Kaushik Death Reason: चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक आता आपल्यात नाहीत. आज सकाळी अनुपम खेर यांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली आणि सर्वांनाच धक्का बसला. बॉलिवूडवर शोककळा पसरली. ६६ वर्षांच्या सतीश कौशिक यांची बुधवारी रात्री प्राणज्योत मालवली. दोन दिवसांपूर्वीच धडधाकट दिसणाऱ्या सतीश यांचं अचानक निधन कशामुळे झालं, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यांच्या निधनाचं कारण नुकतंच समोर आलं आहे.
सतीश कौशिक गुरूग्राम येथे आपल्या एका आप्ताला भेटायला आले होते. इथेच त्यांची प्रकृती बिघडली. कारमध्येच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. अभिनेते अनुपम खेर यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सतीश कौशिक आपल्या मित्राच्या घरी होते. त्यादरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांनी लगेच ड्रायव्हरला बोलावलं. मला हॉस्पीटलमध्ये घेऊन चल, असं ते म्हणाले. ड्रायव्हरने त्यांना कारमध्ये घेतलं. मात्र कारमध्येच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळी रात्रीचा १ वाजला होता.
७ मार्चला मुंबईत जावेद अख्तर यांच्या होळी पार्टीत ते सामील झाले होते. या होळी पार्टीत त्यांनी कुटुंबीय व मित्रांसोबत मनसोक्त होळी खेळली होती. ८ मार्चला ते दिल्लीला पोहोचले. इथेही त्यांनी जल्लोषात होळी साजरी केली. मात्र रात्री त्यांची प्रकृती बिघडू लागली. त्यांना त्वरित फोर्टिस रूग्णालयात हलवण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केलेत. पण त्यांना वाचवता आलं नाही. पहाटे ५.३० वाजता त्यांचं पार्थिव दीनदयाल रूग्णालयात आणण्यात आलं. इथे त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन केलं गेलं. शवविच्छेदनानंतर त्यांचं पार्शिव मुंबईत आणलं जाईल.
सतीश कौशिक हे अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, कॉमेडियन आणि पटकथालेखक होते. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया इथून त्यांनी अभिनयाचे धडे घेतले. सतीश कौशिक यांनी रंगभूमीवरून करिअरची सुरुवात केली होती. ‘मिस्टर इंडिया’, ‘दिवाना मस्ताना’, ‘ब्रिक लेन’, ‘साजन चले ससुराल’ यांसारख्या बऱ्याच चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. तर ‘रुप की रानी चोरों का राजा’, ‘प्रेम’, ‘हम आपके दिल मे रहते है’, ‘तेरे नाम’ यांसारख्या चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं.