कोरोना महामारीने बॉलिवूडच्या आणखी एका तरूण प्रतिभेला आपल्यापासून हिरावले आहे. जग्गा जासूस, लुडो, प्यार का पंचनामा अशा अनेक चित्रपटांचा युवा एडिटर अजय शर्मा (Ajay Sharma) याचे कोरोनामुळे निधन झाले. दिल्लीत त्याने अंतिम श्वास घेतला. त्याच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटींनी त्याच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. (bollywood film editor Ajay Sharma )
एबीपी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, अजयला कोरोनाची लागण झाली होती. दोन आठवड्यांपासून दिल्लीच्या राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रूग्णालयाच्या आयसीयू वार्डात त्याच्यावर उपचार सुरु होते. आज पहाटे 2 च्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. 40 वर्षांपेक्षाही कमी वयाच्या अजयमागे पत्नी व 4 वर्षांचा एक मुलगा आहे.
अजयने बर्फी, ये जवानी है दीवानी, अग्निपथ, काई पो चे, लाईफ इन मेट्रो, द डर्टी पिक्चर अशा सिनेमांसाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणूनही काम केले होते. जॉली 1995 ही शॉर्ट फिल्म त्याने दिग्दर्शित केली होती. एडिटींग क्षेत्रात अजयचे मोठे नाव होते. गतवर्षी अॅमेझॉन प्राईमवरची ‘बैंडिट बंदिश’ ही हिट वेबसीरिजही त्यानेच एडिट केली होती. या सीरिजचे दिग्दर्शक आनंद तिवारी यांनी अजयच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. अजय हा खूप उत्तम एडिटर होता. त्याच्या रूपात आम्ही आज एक प्रतिभावान व्यक्ती गमावली़, असे ते म्हणाले.