'हम दिल दे चुके सनम','रामलीला','बाजीराव-मस्तानी' असे अनेक सुपरहिट सिनेमाबॉलिवूडला देणारे दिग्दर्शक म्हणजे संजय लीला भन्साळी (sanjay leela bhansali) . आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी असंख्य गाजलेले सिनेमा इंडस्ट्रीला दिले. त्यामुळे नावाजलेल्या दिग्दर्शकांच्या यादीत त्यांचं नाव कायम प्रथम स्थानावर घेतलं जातं. ज्याप्रमाणे संजय लीला भन्साळी त्यांच्या प्रोफेशनल लाइफमुळे चर्चेत येतात. त्याचप्रमाणे अनेकदा त्यांच्या पर्सनल लाइफचीही चर्चा होते. यात खासकरुन त्यांच्या नावाची. भन्साळी त्यांच्या नावापुढे कायम आपल्या आईचं नाव लावतात. त्यामुळे आईचं नाव लावण्यामागील कारण किंवा त्यांच्या वडिलांचं खरं नाव काय असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडतात. म्हणूनच, आज त्यांच्या वडिलांचं नाव काय आणि ते आईचं नाव का लावतात यामागचं कारण जाणून घेऊयात.
अलिकडेच संजय लीला भन्साळी यांची 'हिरामंडी ' ही वेबसीरिज प्रदर्शित झाली. ही सीरिज सध्या सोशल मीडियावर बरीच गाजत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा संजय लीला भन्साळी चर्चेत आले आहेत. यात त्यांच्या नावाची नेटकऱ्यांमध्ये चर्चा होतीये.
...म्हणून भन्साळी लावत नाहीत वडिलांचं नाव
संजय लीला भन्साळी यांचे वडील प्रसिद्ध निर्माता होते. मात्र, करिअरमध्ये अनेक चढउतार सहन केल्यामुळे ते दारुच्या आहारी गेले होते. दारुच्या नशेत असल्यामुळे त्यांचं घराकडे दुर्लक्ष होऊ लागलं होतं. त्यामुळे वडिलांची ही अवस्था पाहता संजय भन्साळी यांच्या आईने लीला भन्साळी यांनी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्या गुजराती नाटकांमध्ये वगैरे काम करुन घरखर्च चालवत होत्या. इतकंच नाही तर त्यांनी अनेकदा लोकांचे कपडेदेखील शिवून दिले. त्यामुळेच आपल्या आईने आयुष्यभर केलेला संघर्ष, कष्ट याची जाणीव ठेऊन संजय भन्साळी यांनी त्यांच्या नावापुढे आईचं नाव लावण्यास सुरुवात केली.
काय आहे त्यांच्या वडिलांचं नाव
संजय लीला भन्साळी यांच्या वडिलांचं नाव डी. ओ. भन्साळी असल्याचं सांगण्यात येतं. मात्र, ते कायम आईचं नाव लावत असल्यामुळे त्यांच्या वडिलांचं नाव फार मोजक्या जणांना माहित आहे.