Hrithik Roshan : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि अमिषा पटेल (Ameesha Patel) मुख्य भूमिकेत असलेला 'कहो ना प्यार है' हा चित्रपट जवळपास २५ वर्षानंतर थिएटरमध्ये पुन: प्रदर्शित करण्यात आला आहे. इतकी वर्षे उलटूनही चित्रपटाची क्रेझ काही कमी झालेली दिसत नाही. प्रेमाची परिभाषा सांगणारा 'कहो ना प्यार है' चित्रपटाला आता देखील प्रेक्षकांचा तेवढाच प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. दरम्यान, याच निमित्ताने अभिनेत्याने त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमधील आठवणी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. जवळपास २७ वर्षापूर्वी हृतिकने लिहिलेल्या खास डायरीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
'कहो ना प्यार है' हा चित्रपट १४ जानेवारी २००० च्या दिवशी रिलीज करण्यात आला होता. हृतिक-अमिषाची ही डेब्यू फिल्म होती. शिवाय त्यावेळी सर्वाधिक लोकप्रियता मिळवलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट ठरला होता. दरम्यान, हृतिक रोशनने या निमित्ताने एक्स अकाउंटवर त्याच्या जुन्या डायरीचा फोटो शेअर केलाय. त्यासोबत अभिनेत्याने आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे. या पोस्टमध्ये हृतिकने लिहिलंय, "माझ्या २७ वर्षांपूर्वीच्या नोट... माझा पहिला सिनेमा 'कहो ना प्यार है' साठी एक अभिनेता म्हणून तयारी करत असताना मी तेव्हा खूपच नर्व्हस असायचो. आता जेव्हा मी कोणत्याही नवीन चित्रपटाचं शूटिंग सुरु करतो तेव्हा देखील मला तसंच वाटतं. या नोट्स शेअर करताना खरंतर मलाच विचित्र वाटतं आहे. पण, गेली २५ वर्षे मी इंडस्ट्रीत सक्रिय असल्यामुळे मी आता मी सगळं हाताळू शकेन असं मला वाटतंय."
यापुढे हृतिकने या पोस्टमध्ये त्याच्या फिल्मी करिअरमध्ये घडलेल्या अविस्मरणीय गोष्टींबद्दल चाहत्यांचे आभार देखील मानले आहेत. त्यावर अभिनेत्याने म्हटलंय, ''आज 'कहो ना प्यार है' चित्रपट प्रदर्शित होऊन २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. मला फक्त या जुन्या नोट्स तुम्हाला दाखवायच्या आहेत. या नोट्समुळे एका गोष्टीने मला समाधान मिळतं. मी पहिल्याच पानावर लिहिलंय की, तसा दिवसच पुन्हा कधी अनुभवायला मिळाला नाही. परंतु मी ते क्षण मिस केले. कारण त्यावेळी मी फक्त आणि फक्त तयारी करण्यात व्यस्त असायचो." अशी पोस्ट त्याने शेअर केली आहे.