बॉलिवूड अभिनेता आमीर खान (Aamir Khan) याचा लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर आमीर आणि त्याच्या कारकिर्दीतील काही चित्रपटांची चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे. विशेष म्हणजे या चर्चांमध्ये मेला गाजलेल्या चित्रपटातील डाकू गुज्जरदेखील चर्चेत आला आहे. गेल्या कित्येक काळापासून गुज्जर कलाविश्वापासून दूर असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळेच हा अभिनेता काय करतो ते जाणून घेऊयात.
'मेला' हा चित्रपट आमीरच्या करिअरमधील फ्लॉप चित्रपट असल्याचं म्हटलं जातं. मात्र, आजही या चित्रपटाचं नाव लोकप्रिय चित्रपटांच्या यादीत घेतलं जातं. या चित्रपटामध्ये आमीर खानसह ट्विकल खन्ना मुख्य भूमिकेत झळकली होती. तर गुज्जर ही खलनायकाची भूमिका अभिनेता टीनू वर्मा (Tinu Verma) यांनी साकारली होती. विशेष म्हणजे खलनायकाची भूमिका साकारुनही त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली.
गुज्जर ही भूमिका साकारल्यानंतर टीनू वर्मा यांचं नाव प्रसिद्ध खलनायकांमध्ये घेतलं गेलं. २००० मध्ये आलेल्या मेला या चित्रपटाव्यतिरिक्त टीनू वर्मा यांनी माँ तुझे सलाम या चित्रपटासह काही भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं. टीनू वर्मा अभिनेता असण्यासोबतच प्रसिद्ध स्टंट डायरेक्टरदेखील आहेत. त्यांनी १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या शोला और शबनम या चित्रपटापासून ते गदरपर्यंत त्यांनीच सनी देओलला स्टंट शिकवले आहेत.
दरम्यान, टीनू वर्मा यांचा आता कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. सोशल मीडियावरही ते फारसे सक्रीय नाहीत. २०१३ मध्ये आपल्या सावत्र भावावर तलवारीने वार केल्यामुळे ते चर्चेत आले होते. वैयक्तिक वादामधून त्यांनी भावावर हल्ला केला आणि त्यानंतर फरार झाले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेत त्यांना अटक केली होती. तेव्हापासून ते बॉलिवूडपासून दूर झाले. २०१६ ते २०२० पर्यंत ते भोजपुरी कलाविश्वात कार्यरत असल्याचं सांगण्यात येतं.