Manoj Muntashir supported Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौतचा बहुप्रतिक्षित 'इमर्जन्सी' या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे आता 'इमर्जन्सी' चित्रपट ६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार नाही. सध्या या सिनेमाला बराच संघर्ष करावा लागतोय. सेन्सॉरकडून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी या सिनेमाची धडपड सुरु आहे. गीतकार मनोज मुंतशीर कंगनाच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. त्यांनी शीख समुदायाच्या लोकांना आंदोलन थांबवण्याचे आवाहन केले आहे.
कंगना राणौतने सोशल मीडियावर गीतकार मनोज मुंतशीर यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मनोज यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, "चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र न मिळाल्याने इमर्जन्सी सिनेमा हा 6 सप्टेंबरला प्रदर्शित होणार नाही. पण हा सर्टिफिकेटचा खेळ अर्धवट का खेळला जातोय? यासोबतच आमच्याकडून दुसरे प्रमाणपत्र हिसकावून घेतले पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी आम्ही लोक आहोत, असे आपण म्हणतो. अरे हे मोठेपणाचं ढोंग सोडा. आपण एक चित्रपट सहन करू शकत नाही आहोत. मग अभिव्यक्ती स्वातंत्र्य कसे सहन करणार?", असा सवाल त्यांनी केला.
"बरं सिनेमाबद्दल काय अडचण आहे? तर त्यात इंदिरा गांधींची निर्घृण हत्या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. मग इंदिराजींचा मृत्यू रस्ता अपघातात झाला का? त्यांचा खून झाला नव्हता? अडचण अशी आहे की त्यांच्या मारेकऱ्यांना शीख दाखवण्यात आले आहे, मग सतवंत सिंग आणि बेअंत शीख नव्हते का? अडचण ही आहे की जरनैल सिंह भिंडरावाले यास आंतकवादी दाखवण्यात आलं आहे. तर मग हजारो लोकांची हत्या करणारा तो आंतकवादी नव्हता का?, असे प्रश्न मनोज यांनी केले.
"या चित्रपटाच्या काही भागांवर शीख समुदायाचा आक्षेप आहे. हे मी मानायलाच तयार नाही की 'एक ओंकार सतनाम' म्हणत सत्यासाठी निर्भयपणे उभे राहिलेले शीख एका चित्रपटात दाखवलेल्या सत्याने घाबरले आहेत. शीख हे भारताच्या इतिहासातील एक सुवर्ण पान आहेत. जेव्हा डोक्यावर केशरी पगडी घालून शीख बाहेर पडतात, तेव्हा सारा देश त्यांच्याकडे आदराने पाहतो. कारण त्या पगडीच्या प्रत्येक पटीत आपल्या महान गुरूंचे शौर्य दिसून येते. शिखांची ओळख ही जरनैल सिंह भिंडरावाला याच्यावरुन केली जाणार का ? असा सवाल त्यांनी केला.
मनोज यांनी म्हटलं, "ज्यांच्या रक्षणाची शपथ घेतली, त्यांच्या अंगावर गोळ्या झाडणाऱ्या त्या सतवंतसिंग आणि बेअंत यांना कोणी आपले हिरो कसे मानू शकेल? 1984 मध्ये निरपराध शिखांना सतवंत आणि बेअंत यांच्या गुन्ह्यांची भरपाई द्यावी लागली. 1984 हे भारताच्या इतिहासात आणीबाणीइतके काळे पान आहे, पण शिखांनी कधीही व्हिक्टिम कार्ड खेळले नाहीत. भारताशी वैर नव्हते. आजही सैन्यात शिखांची संख्या भरपूर आहे. 1984 नंतर सीमेवर प्राणांची आहुती देणाऱ्यांची यादी बनवली गेली, तरी शिखांची संख्या कोणापेक्षा कमी नाही. अशा धाडसी लोकांना चित्रपटाची भीती वाटावी, यावर मी विश्वास ठेवण्यास नकार देतो".
पुढे ते म्हणाले, "मी सर्वांना आवाहन करतो की पुढाकार घ्या आणि कंगना रणौतच्या विरोधात तुमच्या ज्या काही तक्रारी आहेत, त्या कोर्टात न्या. कायदा त्यावर निर्णय घेईल. हा चित्रपट एकट्या कंगनाचा नाही. 500 लोकांच्या क्रूने घाम गाळून चित्रपट बनवला आहे. त्यांच्यावर अन्याय होता कामा नये. सेन्सॉर बोर्डावर जो दबाव टाकला जात आहे, त्यांचा निषेध नोंदवतो. हा दबाव नैतिक नसून राजकीय आहे. काही घाबरलेले लोक संपूर्ण समाजाचे प्रतिनिधित्व करत नाहीत. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटात काही चुकीचे दाखवण्यात आले आहे असे वाटत असेल तर त्याचा निषेध करा, मीही तुमच्यासोबत उभा राहिलं. आमचा तुमच्या विश्वास आहे. कधीकाळी शिखांच्या गर्जनेने औरंगजेबाच्या कानाचा पडदा फाटायचा, ते शीख कधीही कोणाचा आवाज दाबण्यासाठी उभे राहू शकत नाहीत", असं मनोज यांनी म्हटलं.