गंगूबाई काठियावाडी, 'RRR' आणि 'अटॅक' हे तीनही चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहेत. याविषयी पेन इंडिया लिमिडेटने ट्विट करत माहिती दिली आहे. कोरोना काळात चित्रपटगृह बंद असल्यामुळे हे तीनही चित्रपटांच्या ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र, अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका,हे चित्रपट चित्रपटगृहांमध्येच प्रदर्शित होणार आहेत, असं पेन स्टुडिओच्या जयंतीलाल गाडा यांनी स्पष्ट केलं आहे.
पेन स्टुडिओचे अध्यक्ष आणि एमडी डॉ. जयंतीलाल गाडा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर पोस्ट शेअर करत तीनही चित्रपट मल्टीप्लेक्समध्येच रिलीज होतील अशी माहिती दिली आहे. "गंगूबाई काठियावाडी, आरआरआर आणि अटॅक हे तीनही चित्रपट चित्रपटगृहांमध्येच प्रदर्शित होणार आहेत", असं शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
संजय लीला भन्साळी यांचा ‘गंगूबाई काठियावाडी’,जॉन अब्राहमचा अटॅक आणि एस.एस. राजमौली यांच्या आरआरआर या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, कोरोना काळात हे तीनही चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. ज्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला होता. मात्र, अखेर हे चित्रपट चित्रपटगृहांमध्येच प्रदर्शित होणार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यामुले चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे.
दरम्यान, 'गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर अटॅक या चित्रपटात अभिनेता जॉन अब्राहम मुख्य भूमिका साकारत आहे. त्याच्यासोबत अभिनेत्रीजॅकलीन फर्नांडिस आणि रकुलप्रीतदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. तर दिग्दर्शक एस.एस. राजमौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर,रामचरण तेजा,आलिया भट व अजय देवगण अशी कलाकारांची तगडी फौज झळकणार आहे.