Join us

'भूल भूलैय्या ३'समोर 'सिंघम अगेन'ची गर्जना थंडावली, ७ दिवसात कमावले फक्त इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2024 11:10 AM

'सिंघम अगेन' आणि 'भूल भूलैय्या ३' सिनेमांना रिलीज होऊन आज आठवडा झाला. ७ दिवसांत भूल भूलैय्या ३ समोर सिंघम अगेन थंड पडलेला दिसतोय

'सिंघम अगेन' आणि 'भूल भूलैय्या ३' हे दोन सिनेमे दिवाळीच्या मुहुर्तावर गेल्या आठवड्यात रिलीज झाले. दोन्ही सिनेमांची चर्चा गेले अनेक महिने सुरु होती. अखेर 'सिंघम अगेन' आणि 'भूल भूलैय्या ३' हे सिनेमे दिवाळीच्या मुहुर्तावर १ नोव्हेंबरला एकाच दिवशी रिलीज झाले. दोन सिनेमांमध्ये बॉक्स ऑफिसवर टक्कर झाल्याने कमाईच्या बाबतीत कोणता सिनेमा सरस ठरणार, याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर 'सिंघम अगेन' आणि 'भूल भूलैय्या ३'चा ७ दिवसांचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आलाय. यामध्ये 'सिंघम अगेन' सिनेमा 'भूल भूलैय्या ३' समोर नांगी टाकताना दिसतोय. 

'सिंघम अगेन' सिनेमा 'भूल भूलैय्या ३'समोर ढेपाळला

एक आठवड्यानंतर 'सिंघम अगेन'चा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आलाय. दिवाळीच्या वीकेंडला घसघशीत कमाई करणाऱ्या 'सिंघम अगेन' सिनेमाने सोमवारी १८ कोटींची कमाई केली. मंगळवारी कमाईत घट होऊन ती १४ कोटींवर आली. याशिवाय बुधवारी सिनेमाने १०.५ कोटींची कमाई केली. गुरुवारी सिनेमाच्या कमाईत आणखी घट होऊन  'सिंघम अगेन'ने ५ कोटी ८३ लाख इतकी कमाई केलीय. अशाप्रकारे  'सिंघम अगेन'ची एकूण कमाई १७०.८ कोटी इतकी झालीय. 

 'सिंघम अगेन'ला भूल भूलैय्या ३ चं आव्हान

दुसरीकडे कार्तिक आर्यनचा 'भूल भूलैय्या ३' माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर थिएटरमध्ये प्रेक्षकांची गर्दी खेचण्यास यशस्वी झालाय. 'भूल भूलैय्या ३'ने एक आठवड्याच्या अखेरीस १५८ कोटींची कमाई केलीय. सुरुवातीला कमी कमाई करणाऱ्या 'भूल भूलैय्या ३'ची एका आठवड्याची कमाई नक्कीच चांगली म्हणावी लागेल. ३५० कोटींचं बजेट असलेल्या  'सिंघम अगेन'ची कमाई बजेटच्या तुलनेत कमीच झालीय.  त्यामुळे  'सिंघम अगेन' हा बिग बजेट सिनेमा कार्तिक आर्यनच्या 'भूल भूलैय्या ३'समोर ढेपाळलाय, असं चित्र स्पष्ट दिसतंय.

 

टॅग्स :अजय देवगणकार्तिक आर्यनभूल भुलैय्यारोहित शेट्टी