Yeh Jawaani Hai Deewani Re-Release: अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ये जवानी है दिवानी' हा सुपरहिट सिनेमा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या सिनेमातील डायलॉग आणि गाणी त्यावेळी गाजली होती. 'बदतमीज दिल', 'दिल्लीवाली गर्लफ्रेंड', 'बलम पिचकारी' या गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं. या चित्रपटात रणबीर-दीपिकासह कल्की कोचलिन आणि आदित्य रॉय कपूर यांसारखे अनेक कलाकार झळकले होते. हा रोमँटिक-कॉमेडी सिनेमा २०१३ मधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक होता. आता तब्बल ११ वर्षानंतर हा सिनेमा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'ये जवानी है' दिवानी चित्रटपटगृहात पुन: प्रदर्शित करण्यात येणार आहे.
नुकतीच सोशल मीडियावर धर्मा मुव्हीजकडून पोस्ट शेअर करत 'ये जवानी है दिवानी' रि-रिलीज करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सोशल मीडियावर 'ये जवानी है दिवानी' चित्रपटाची पोस्टर इमेज शेअर करत लिहिलंय, "द गॅंग इज बॅक... आम्ही सगळेच खुश आहोत कारण 'ये जवानी है दिवानी' ३ जानेवारीला पुन: प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे तारीख लक्षात ठेवा."
'ये जवानी है दिवानी' रि-रिलीज होणार असल्याचं कळताच चाहते देखील उत्सुक आहेत. सोशल मीडियावर धर्मा मुव्हीजने शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी तुफान लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. त्यावर प्रतिक्रिया देत एका नेटकऱ्याने म्हटलंय, "दीपिका पादुकोणच्या वाढदिवसापूर्वी चाहत्यांसाठी ही मनोरंजनाची मेजवानीच आहे जणू... पुन्हा नैना-बनीला स्क्रिनवर पाहून प्रचंड आनंद होईल." तर आणखी एका यूजरने, "कोणी गेलं किंवा नाही गेलं तरी मी मात्र जाणारच... कारण माझा हा आवडता सिनेमा आहे." असं म्हटलंय.