अक्षय कुमार (Akshay Kumar ) म्हणजे, बॉलिवूडचा सर्वाधिक बिझी स्टार. एक संपला की, त्याचा दुसरा सिनेमा लगेच तयार. अक्षयचे सिनेमे त्याच्या नावावर चालतात. अर्थात गेल्या काही दिवसांत चित्र बदललंय. अक्षयचे सिनेमे लागोपाठ फ्लॉप होत आहेत. बच्चन पांडे आपटला. पाठोपाठ आलेला ‘सम्राट पृथ्वीराज’ही दणकून आपटला आणि यानंतरचा ‘रक्षाबंधन’ हा त्याचा सिनेमाही फ्लॉपच्या रांगेत जाऊन बसला. एकापाठोपाठ एक सलग तीन फ्लॉप दिल्यानंतर अक्षयने चिंतन-मंथन सुरू केलं आहे. या फ्लॉप सिनेमांची जबाबदारीही स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे. याशिवाय आणखी एक मोठा निर्णयही घेतला आहे.
होय, अक्षयने म्हणे त्याचं मानधन कमी केलं आहे. झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, आगामी सिनेमांसाठी अक्षयने त्याची फी कमी केली आहे. आश्चर्य वाटेल पण आधी एका चित्रपटासाठी 70-75 कोटी रूपये घेणारा अक्षय आता फक्त 9 ते 18 कोटी रूपये घेणार आहे. अर्थात ज्या चित्रपटांचा तो निर्माता नसेल, त्या चित्रपटाच्या नफ्यात तो 50 टक्के वाटा घेणार आहे.अलीकडे अक्षयने फ्लॉप सिनेमाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. ‘रक्षाबंधन’ आपल्यावर तो यावर बोलला होता. माझे सिनेमे फ्लॉप होत असतील तर त्याची जबाबदारी कलाकार या नात्याने मी घ्यायला हवी आणि मी ती घेतोय. माझ्या फ्लॉप सिनेमांची जबाबदारी माझी आहे. सिनेमे चालत नसतील तर ती चूक माझी आहे. नक्कीच, मी याबद्दल विचार करेल. मला कसे सिनेमे निवडायला हवेत, याचा देखील मी विचार करेल. मी कशा स्क्रिप्ट निवडायला हव्यात, जेणेकरून माझ्या चाहत्यांना माझे सिनेमे आवडतील, याचा गंभीर विचार करेल. मी एखादा सिनेमा करतोय आणि तो चालत नसेल तर त्या अपयशाची संपूर्ण जबाबदारी माझी आहे, असं तो अलीकडे एका मुलाखतीत म्हणाला होता. याचमुळे आता अक्षयने फी कमी करण्याचा निर्णय घेतल्याचं मानलं जात आहे. याआधी आमिर खानने सुद्धा हा फंडा वापरलेला आहे. कमी फी घ्यायची आणि चित्रपटाच्या नफ्यात मोठा शेअर घ्यायचा, असा त्याचा फंडा आता अक्षयही वापरणार आहे.
अक्षयने फ्लॉप सिनेमाची जबाबदारी स्वीकारून फी कमी केल्यानंतर साहजिकच, निर्मात्यांची नजर अन्य स्टार्सवर असणार आहे. अन्य कलाकारांनीही आपली फी कमी करावी, अशी मागणी निर्माते करत आहेत. स्टार्सची फी इतकी असते की चित्रपटाच्या बजेटचा 50 ते 60 टक्के भाग यावर होतो. ए-लिस्ट स्टार्सच्या फीमुळे चित्रपटाचा बजेट वाढतो, असं निर्मात्यांचं मत आहे.