बॉलिवूडमध्ये सध्या एका वेगळ्याच मुद्यावर चर्चा सुरू आहे. ही चर्चा आहे कलाकारांच्या मानधनाबद्दलची. कोरोना महामारीनंतर बॉलिवूडचं जणू कंबरडं मोडलं आहे. गेल्या काळात बॉलिवूडचे अनेक बिग बजेट सिनेमे आलेत आणि आले तसे आपटलेत. यामुळे निर्मात्यांना कोट्यवधी रूपयांचा तोटा सहन करावा लागला. तरीसुद्धा अनेक बॉलिवूड कलाकारांनी आपली फी कमी करण्याऐवजी वाढवली आहे. अलीकडे करण जोहर तोंडात येईल ती रक्कम मानधन म्हणून मागणाऱ्या कलाकारांवर भडकला होता. “तुमच्या चित्रपटांना 5 कोटींची ओपनिंग मिळते आणि तुम्ही 20 कोटी रुपये फी मागता. हे कसं योग्य आहे? भ्रम असा एक आजार आहे ज्याची कोणतीच व्हॅक्सिन नाही”, अशा शब्दांत त्याने बॉलिवूड कलाकारांवर निशाणा साधला होता. आता दिग्गज बॉलिवूड निर्माता भूषण कुमार यांनी यावर असंच परखड मत मांडलं आहे.
पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत भूषण कुमार या मुद्यावर बोलले. ते म्हणाले, ‘अनेक कलाकार मार्केटबद्दल जाणतात आणि त्या हिशेबाने फी मागतात. पण काहीजण मानधनाबद्दल कुठलीही तडजोड करायला तयार नसतात. अशात अनेक निर्माते त्यांच्याकडे पाठ फिरवतात. अद्यापही काही कलाकार आहेत, जे फी कमी करायला नकार देतात. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत काम न करण्याचं धोरण स्वीकारलं आहे. अखेर आम्ही नुकसान का सोसायचं. तुम्ही इतका पैसा कमवता आणि आम्ही तोटा का सहन करायचा.’
गेल्यावर्षीही करण जोहर कलकारांच्या मानधनाबद्दल बोलला होता. ‘ फिल्म कंपेनियन’ या पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत करणने आपला वैताग बोलून दाखवला होता. ‘मेगास्टार्स व ए-लिस्टर्स बिझनेस आणतात. त्यामुळे त्यांच्या डिमांड मी समजू शकतो. पण आजकाल जो तो कोटीत फी मागतो. अनेकदा नव्या पिढीचे कलाकार विनाकारण भलीमोठी फी डिमांड करतात. मला तर अनेकदा आश्चर्य वाटतं. यापैकी अनेकांनी अद्याप स्वत:ला बॉक्स ऑफिसवर स्वत:ला सिद्ध केलेलं नाही. पण तरीही त्यांना 20-30 कोटी फी हवी आहे. अनेकदा इच्छा नसूनही मला अशा लोकांना त्यांचं रिपोर्ट कार्ड दाखवावं लागतं. हॅलो, हे बघ तुझ्या चित्रपटाचं ओपनिंग बघ आणि तू मला इतके कोटी मागतो आहेस, असं मला म्हणावं लागतं. मी टेक्निशिअन्सला डॉलरमध्ये फी द्यायला तयार आहे. माझ्यामते, खरोखर ते सिनेमाला स्पेशल बनवतात. ज्यांनी अद्याप स्वत:ला सिद्धच केलेलं नाही अशांना 20-30 कोटी देण्यापेक्षा मी टेक्निशिअन्सला पैसा देईल,’ असं तो म्हणाला होता.