Join us  

सलमान खानने दगडाने फोडलं होतं 'या' अभिनेत्याचं डोकं; रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत तसंच सोडून काढला होता पळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 3:40 PM

Salman Khan:सध्या सोशल मीडियावर सलमान खानचा हा किस्सा चांगलाच चर्चेत येत आहे. सलमानने नेमकं कोणत्या अभिनेत्याचं डोकं फोडलं हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमुळेही अनेकदा चर्चेत येत असतो. यात खासकरुन त्याचं कलाविश्वातील काही सेलिब्रिटींसोबत असलेलं वैर, ब्रेकअप, पॅचअप यांची चर्चा रंगत असते. सध्या सलमान अशाच एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. एकेकाळी सलमानने बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेता,दिग्दर्शकाचं दगडाने डोकं फोडलं होतं. इतकंच नाही तर घाबरलेल्या सलमानने या अभिनेत्याला रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत तसंच सोडून पळ काढला होता. 

सध्या सोशल मीडियावर सलमान खानचा हा किस्सा चांगलाच चर्चेत येत आहे. सलमानने नेमकं कोणत्या अभिनेत्याचं डोकं फोडलं हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. तर हा अभिनेता म्हणजे दुसरा-तिसरा कोणीही नसून त्याचा सख्खा भाऊ सोहेल खान (Sohail Khan) आहे. आज सोहेल त्याचा ५१ वा वाढिवस साजरा करत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टी चर्चेत येत आहेत. यामध्येच सलमानने त्याचं डोकं फोडल्याचं वृत्त समोर येत आहे.

सलमान आणि त्याच्या भावंडांमध्ये असलेलं उत्तम बाँण्डिंग साऱ्यांनाच ठावूक आहे. त्यामुळे कोणतीही घटना घडल्यावर हे भावंड एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. 'द कपिल शर्मा शो'मध्ये सलमानने त्याच्या बालपणीच्या आठवणींना  उजाळा दिला होता. यात लहानपणी सोहेलला दगडाने मारल्याचं त्याने कबूल केलं होतं.

"खूप वर्षांपूर्वी आम्ही तीनही भावंड मिळून टार्झन हा चित्रपट पाहत होतो आणि दुसरीकडे खेळतही होतो. हा खेळ खळत असताना आमच्या हातात दगड होते. त्यावेळी काही तरी झालं ज्यामुळे मला इतका राग आला की मी हातातला दगड घेतला आणि सोहेलला फेकून मारला. त्यावेळी सोहेल खूपच लहान होता. त्यामुळे घाबरुन तो एका कचऱ्याच्या पेटीमागे लपला. त्याला तेथून बाहेर काढल्यानंतर आम्ही पाहिलं तर त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होतं", असं सलमान म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "सोहेलला रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर मी आणि अरबाजने तेथून धूम ठोकली."

दरम्यान, सोहेल खान हा सलमानचा धाकटा भाऊ असून त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र, अभिनयापेक्षा तो निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात जास्त रमला. त्याने ‘मैंने प्यार क्यों किया’, ‘हीरो’, ‘वीर’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच  जय हो या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं आहे. 

टॅग्स :सलमान खानसोहेल खानसेलिब्रिटीबॉलिवूड