हिंदी, मल्याळम, ऊर्दू, तेलगु यासारख्या प्रादेशिक भाषांमध्ये बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक कैलाश खेर याने गाणी गायली आहेत. ‘तेरी दिवानी’ हे त्याचे गाणे तर चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. तुम्हाला ठाऊक आहेच की, आज त्याने त्याचा वाढदिवस साजरा केला. पण, तुम्हाला माहिती आहे का, कैलाश खेर याने एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. एवढेच नाही तर त्याच्या पत्नीने देखील लहानपणी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान दोघांनी ही आपबीती शेअर केली.
हिंदुस्थान टाइम्सच्या सुत्रांनुसार, कैलाश खेर याची पत्नी शितल भानने एका मुलाखतीत सांगितले,‘ती लहान असताना तिच्या आयुष्यात एक अशी अप्रिय घटना घडली. ज्यामुळे ती नैराश्यात गेली. ती १५ वर्षांची असताना तिच्यासोबत ही घटना घडली. मी ही घटना सांगू शकत नाही. मी खरंतर ही गोष्ट माझ्या घरच्यांना देखील सांगितली नाही. आमच्याकडे तशी पद्धत नाहीये.’ पुढे शीतल सांगते,‘ आमच्या समाजात कुटुंबियांना अशा गोष्टी सांगण्याची परंपरा नाही. या घटनेमुळे माझे बालपण खूपच तणावात आणि त्रासात गेले. त्यामुळे मी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दुसऱ्यांदा केलेला आत्महत्येचा प्रयत्न स्वत:ला त्रास करू न घेणारा होता.’
शीतलने तिची आपबीती सांगताना पुढे म्हटले,‘मी माझे दु:ख कुणासोबत तरी शेअर करू इच्छित होते. पण, माझ्या कुटुंबात असे कोणीही नव्हते ज्याच्यासोबत मी माझ्या मनातील काही गुपिते सांगेल. आमच्याकडे अपत्य जर शांत बसले असेल तर त्याचे काऊंसिलिंग करण्याची पद्धत नाही. परीक्षांमध्ये माझे मार्क्स देखील फार कमी येत असत. मी सर्व पालकांना आवाहन करू इच्छिते की, कृपा करून आपल्या मुलांना समजून घ्या. त्यांना नैराश्यात जाण्यासाठी भाग पाडू नका.’
पुढे कैलाश खेर यांनी त्यांच्या आत्महत्येची आपबीती सांगताना म्हटले की,‘मी खूप पैसे गमावले होते. माझे आयुष्य एकाच ठिकाणी थांबले गेले होते. मी एक वर्षापर्यंत नैराश्यात होतो. त्यामुळे मला काहीच साध्य झाले नाही मग मी माझे आयुष्य संपवण्याचा विचार केला. मी नदीत जीव देऊन माझे आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला मात्र, माझ्या मित्रांनी माझा जीव वाचवला.’