Join us

Singer KK Passes Away : प्रसिद्ध गायक केके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; 53व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2022 12:07 AM

ते कोलकाता येथे कॉन्सर्टसाठी गेले होते. मात्र, कॉन्सर्टनंतर अचानकपणे त्यांची प्रकृती खालावली ...

प्रसिद्ध गायक केके उर्फ कृष्ण कुमार कुन्नथ यांचे निधन झाले आहे. ते कोलकाता येथे कॉन्सर्टसाठी गेले होते. मात्र, कॉन्सर्टनंतर अचानकपणे त्यांची प्रकृती खालावली आणि ते खाली कोसळले. यानंतर त्यांना तत्काळ जवळच्या एका रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ते 53 वर्षांचे होते.मिळालेल्या प्राथमिक माहतीनुसार, केके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मात्र यासंदर्भात अद्याप डॉक्टरांनी कसल्याही प्रकारचे भाष्य केलेले नाही. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल, असे त्यांचे म्हणणे आहे.

केके हे बॉलिवूडमधील सर्वोत्तम गायकांपैकी एक होते. त्यांनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांनी जवळपास 200 हून अधिक सुपरहिट गाणी दिली आहेत. 90 च्या दशकातील त्यांच्या त्यांच्या 'यारो' या गाण्याने त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. केके यांनी रोमॅण्टिक गाण्यांसोबतच पार्टी साँग्सदेखील गायले आहेत.

केकेंनी गायलेले गाणे हे नेहमीच नवे-नवे वाटतात. त्यांनी गायलेले 'खुदा जाने' हे रोमॅन्टिक गाणे, 'इट्स द टाइम टू डिस्को, कोई कहे कहता रहे, तडप तडप के इस दिल से', सारखे गाणे अगदी हृदयाला  स्पर्श करतात.

याशिवाय, शाहरुख खानचा चित्रपट ओम शांति ओमचे गाणे 'आंखों में तेरी अजब सी', बजरंगी भाईजानचे 'तू जो मिला', इकबाल फिल्मचे 'आशाएं' आणि अजब प्रेम की गजब कहानी चित्रपटातील गाणे 'मैं तेरा धडकन तेरी' ही त्यांच्या चाहत्यांतील सर्वाधिक पॉप्युलर गाणी होती.केके यांच्या अकाली निधनाबद्दल पंतप्रधान मोदींनीही दुःख व्यक्त केले आहे. "केके नावाने प्रसिद्ध असलेले गायक कृष्णकुमार कुन्नाथ यांच्या अकाली निधनाने दु:ख झाले. त्याच्या गाण्यांमध्ये सर्व वयोगटातील लोकांसाठीच्या भावनांचे प्रतिबिंब दिसत. ते त्यांच्या गाण्यांच्या माध्यमाने नेहमीच आपल्या स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबा प्रति आणि चाहत्यांप्रती संवेदना. ओम शांती," अशा आशयाचे ट्विट मोदींनी केले आहे.

 

टॅग्स :बॉलिवूडमृत्यू