पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (pahalgam attack) जगभरातील सामान्य नागरिकांपासून राजकीय व्यक्ती आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. या हल्ल्यात २६ निष्पाप माणसांना त्यांचे प्राण गमवावे लागले. या हल्ल्यामुळे बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी संताप व्यक्त करत आहेत. अशातच प्रसिद्ध गायक सलीम मर्चंटने (salim merchant) सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन त्याची प्रतिक्रिया नोंदवली. "मला मुसलमान असल्याची लाज वाटते", असं सलीम म्हणाला.
सलीम मर्चंटने व्हिडीओ शेअर केला आणि म्हणाला की, "पहलगाममध्ये ज्या निर्दोष व्यक्तींची हत्या झाली त्यावेळी ते मुसलमान नव्हते तर हिंदू होते म्हणून त्यांना मारलं गेलं. हे मारेकरी मुस्लीम नाही तर ते आतंकवादी आहेत. कारण इस्लाममध्ये हे सर्व शिकवलंं जात नाही. धर्माच्या विषयात कोणतीही जबरदस्ती नाही, हे कुरान शरीफमध्ये लिहिलं गेलंय. मुस्लीम असून मला हे सर्व बघावं लागतंय याची मला लाज वाटतेय. माझ्या निर्दोष हिंदू भावंडांना इतक्या निर्दयीपणे मारलं गेलं. ते फक्त हिंदू आहेत म्हणून त्यांना मारण्यात आलं. हे सर्व कधी संपणार?"
"काश्मीरमध्ये राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यात पुन्हा त्याच समस्या दिसून येत आहेत. मी माझं दुःख आणि राग कसा व्यक्त करु हे मला कळत नाहीये. ज्या निष्पाप माणसांनी या हल्ल्यात त्यांचे प्राण गमावले आहेत त्यांच्यासाठी डोकं टेकून मी प्रार्थना करतो. परमेश्वर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला शक्ती देईल, अशी आशा आहे." अशाप्रकारे सलीम मर्चंटने त्याचा राग व्यक्त केलाय. अनेक लोकांनी सलीमच्या पोस्टचं समर्थन केलं आहे.