अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee ) बॉलिवूडचा मोठा स्टार. पण हे स्टारपण मिळवण्यासाठी त्यानं मोठा संघर्ष केला. अभिनेता बनण्याचं स्वप्नं घेऊन बिहारमधून एनएसडीत पोहोचलेल्या मनोज वाजपेयी प्रवास सोपा नव्हता. दिल्लीच्या आठवणी हा मनोज वाजपेयीच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. दिल्लीला ‘दिलवालों का शहर’ म्हटलं जातं. अशात शहरात मनोज वाजपेयीही प्रेमात पडला नसेल तर नवल. तो प्रेमात पडला. पण त्याची पहिली प्रेमकहाणी अधुरी राहिली ती कायमचीच. आज आम्ही मनोज वाजपेयीच्या याच प्रेमाचा किस्सा तुम्हाला सांगणार आहोत.
दिल्लीत आल्यानंतरची तीन वर्ष पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यात, शिकण्यात गेले. या तीन वर्षात प्रेमात पडायला त्याच्याजवळ वेळ नव्हता. तसाही तो स्वभावानं लाजरा. इतका की, घरच्या बायकांसोबतही बोलताना त्याचे पाय थरथरायचे. अशात शहरी पोरींच्या फंदात पडणं त्याच्यासाठी तसं अशक्य होतं. पण तरीही हा किस्सा घडलाच.
तेव्हा मनोजने बॅरी जॉनसोबत काम करणं सुरू केलं होतं. यादरम्यान अॅक्टिंग वर्कशॉपसाठी त्याला नैनीतालला जावं लागलं. येथे ‘ती’ त्याच्या सोबत होती. मनोज हळूहळू तिच्यासोबत बोलू लागला. थिएटरपासून जगभरातील मुद्यांवर चर्चा दोघं चर्चा करत, गप्पा करत. तिचं मनोजसोबत मनमोकळं वागणं पाहून कुणालाही ती त्याच्या प्रेमात असल्याचा गैरसमज व्हावा. मनोज वाजपेयीही हाच गोड गैरसमज झाला. मनोज नैनीतालवरून परतला. पण ती त्याच्या डोक्यातून जाईना. तो तिच्यासोबत भावी आयुष्याचं सुंदर स्वप्न रंगवू लागला.
एक दिवस मंडी हाऊसच्या दिशेने दोघंही फिरायला गेलेत. दोघंही भटकत असताना अचानक एक कार तिच्याजवळ येऊन थांबली. त्यात एक मुलगा बसलेला होता. तिने त्याला पाहिलं आणि ती लगेच कारमध्ये बसली. मनोजला काही कळायच्या आधीच कार आली तशी भरकन् निघून गेली आणि ती आयुष्यातून गेली ती कायमचीच. मनोजचं पहिल्या प्रेमाचं स्वप्नं पूर्ण होण्याआधीच भंगलं. तिच्या विरहात मनोजने अन्नपाणी सोडलं. पण ती गेली ती गेलीच...हा पहिल्या प्रेमाचा किस्सा मनोजने आपल्या ‘कुछ पाने की जिद’मध्ये सांगितला होता.